नव्या संसद भवनाचा वाद, फडणवीसांनी करून दिली इंदिरा गांधी-राजीव गांधींची आठवण
भारताच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे रोजी होत आहे. संसद भवनाच्या या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते होत नसल्यामुळे विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या बहिष्काराच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी विरोधकांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचीही आठवण करून दिली आहे.
‘लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन या देशाची शान आहे, या देशाची ताकदही आहे. जेवढ्या कमी वेळात हे संसद भवन जेवढ्या भव्यतेने बनलं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे, असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत, ते कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला डबल लॉटरी! मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद मिळणार आहे. आज बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत, त्याआधी मुख्यमंत्री शिवसेना खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील केंद्रीय विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे, याचवेळी सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपदासंदर्भात चर्चाही करणार आहेत.
सूर्यदेवाचा प्रकोप, बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांत उष्णता वाढली आहे. त्यामुळे अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. रात्री झोप नाही आणि दुपारी बाहेर पडायची उष्णतेमुळे सोय नाही अशी अवस्था झाली आहे. घामाच्या धारा आणि नको जीव झाला आहे. पाऊस कधी पडेल असं वाटत असतानाच आता बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदेवाचा प्रकोप पाहायला मिळाला.सलग तिसऱ्या दिवशी ही बुलडाणा जिल्ह्यात तापमान चाळीशी पार गेला आहे. आजही खामगाव चे तापमान 44 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव दरवर्षी हॉट शहर म्हणून त्यांची नोंद होते त्यामुळे रखरखत्या उन्हाने जीवाची लाहीलाही होत आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना काल (२३ मे) हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयाने आता मेडिकल निवेदन जारी करून त्यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती दिली आहे. एएनआयने यांसंबंधीचे वृत्त दिले आहे.मनोहर जोशी यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती देण्याकरता हिंदुजा रुग्णालायने मेडिकल स्टेटमेंट जारी केले आहे. यानुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी २२ मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सेमिकोमामध्ये असून त्यांचा श्वासोच्छवास सुरू आहे. तसंच मनोहर जोशी वेंटिलेटरवर नसल्याचंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.
बारावीचा निकाल उद्या, लगेचच श्रेणीसुधार परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि सीआयएससीईने दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल एकाच दिवशी जाहीर केले होते. त्यानंतर राज्य मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार या कडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची माहिती राज्य मंडळाने जाहीर केली आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी, तसेच आपली श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची आणखी एक संधी दिली जाते. त्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची श्रेणीसुधार परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ मे पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
“…तर २०२४ ला मोदी सरकार येणार नाही”, अरविंद केजरीवालांनी सांगितलं कारण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये भाजपाविरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आमचं सरकार आलं आणि काहीच दिवसांत केंद्र सरकारने आमच्या शक्ती हिरावल्या. आमच्या अधिकारांवर घाला घालणारा वटहुकूम काढला. परंतु आठ वर्ष आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढाई लढलो आणि आठ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमची शक्ती हिरावली. हे लोक सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत.
सपा नेते आझम खान निर्दोष मुक्त
रामपूरचे माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आझम खान यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. रामपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाने बुधवारी हेट स्पीच प्रकरणात निर्णय दिला. या निर्णयानुसार, सपा नेता आझम खान यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याच हेट स्पीचमुळे आझम खान यांची आमदारकी गेली होती.आझम खान यांच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी बुधवारी रामपूरच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. बुधवारी न्यायालयाने आझम खान यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, याआधी रामपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता विशेष खासदार-आमदार न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबरला सपा नेत्याविरोधात निकाल दिला होता.
“करोनाहून भयंकर आजारासाठी जगानं तयार राहावं”, WHO प्रमुख डॉ. टेड्रॉस यांचा गंभीर इशारा!
गेल्या तीन वर्षांमध्ये करोनानं जगभरात घातलेलं थैमान आपण सर्वांनीच पाहिलं. लाखो लोकांचा मृत्यू झाला, तर अजूनही लाखो लोक उपचार घेत आहेत. आत्ता कुठे करोनाचं संकट ओसरलं असतानाच करोनाहून भयंकर आजारासाठी जगानं तयार राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रियेसस यांनी दिला आहे. जिनिव्हामध्ये आयोजित करण्यात आलेल्या हेल्थ असेम्ब्लीसमोर ते बोलत होते. यावेळी त्यांनी करोनाचाही नवा व्हेरिएंट येण्याची भीती व्यक्त केली. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन, कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू
प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचं निधन झालं आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं ५१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीजवळ शूटिंगसाठी गेले होते. मंगळवारी(२३ मे) रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. नितेश पांडे यांच्या पत्नीचा भाऊ व निर्माता सिद्धार्थ नगर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. ‘ईटाइम्स’शी संवाद साधताना ते म्हणाले, “नितेश माझ्यापेक्षा खूप तरुण होते. त्यांना हृदयासंबंधित कोणताही विकार नव्हता. त्यांच्या निधनाने माझ्या बहिणीला धक्का बसला आहे. तिच्याशी मी बोलूही शकत नाहीये.”
वैभवी उपाध्यायने निधनाच्या १६ दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. ती ३९ वर्षांची होती. हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. वैभवीच्या निधनानंतर तिच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.वैभवी उपाध्याय ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत होती. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीबरोबर हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेली होती. याची एक पोस्ट तिने शेअर केली होती.
SD Social Media
9850 60 3590