‘शेर शिवराज’चे भारतात १००० तर परदेशात १०० शोज हाऊसफुल

लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ रूपी चौथे सिनेपुष्प रसिक दरबारी सादर केले. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळाले.

केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘शेर शिवराज’चा डंका वाजत असून लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत, साहसदृश्ये या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. पहिल्या दोन आठवडयांच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या आठवड्यातही ‘शेर शिवराज’ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’नंतर ‘शेर शिवराज’च्या रूपात ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळत आहे.

पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, ‘शेर शिवराज’च्या टिमने घेतलेल्या मेहनतीवर रसिकांनी कौतुकाची थाप मारल्याचं सांगणारे हे आकडे आहेत.

टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला ९७% रेटींग मिळालं आहे. परदेशांमध्ये सध्या १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये ‘शेर शिवराज’ पाहिला जात आहे. यात युएसएमधील २०, जर्मनीतील १०, दुबईमधील १०, युकेमधील ५, कॅनडातील ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये ३, युएई, बहारीन, ओमानमध्ये ५ शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. परदेशांमध्ये मराठी चित्रपटाला मिळत असलेलं हे यश खूप मोठं आणि मराठी सिनेसृष्टीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅलिफोर्नियास्थित फाइव्ह डायमेंशन एंटरटेनमेंटच्या सहकार्याने मुंबई मूव्ही स्टुडिओजने हे आंतरराष्ट्रीय वितरण केले आहे. मुंबई मुवी स्डुडिओजच्या साथीने जीसीसी देशातील वितरणाची जबाबदारी दीपा भारथ यांनी सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.