नव्या संसदेच्या उद्घाटनाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारी
संसदेच्या नव्या इमारतीचं २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणं गरजेचं असताना पंतप्रधानांना हा मान दिल्याने देशभरातील विरोधी पक्षांनी याविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे देशभरातील १९ पक्षांनी संयुक्तरित्या पत्रक काढत उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावं, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.सीआर जया सुकीन यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याकरता लोकसभा सचिवालयाला दिशा, निरीक्षण किंवा सूचना देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. १८ मे रोजी लोकसभेच्या महासचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या संसदेचे उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले आहे, असे या याचिकेत नमूद केले आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना आमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे.
हिंगोलीत भीषण अपघात, पाचजणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजणांसह एकूण १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.मृतांमध्ये सलमान अली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम आली यांचा समावेश आहे. यामधील एकजण राजस्थानमधील, तर इतर चौघे मध्य प्रदेशातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू
दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते ठेवण्यात आले आहेत. यातील एका मादी चित्त्याने २४ मार्चला चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील दोन बछड्यांचा गुरुवारी ( २५ मे ) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिन्यातील चित्त्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे.कुनो राष्ट्रीय उद्यानाने दिलेल्या माहितीनुसार, मादी चित्ता ज्वाला हीने २४ मार्च २०२३ ला चार बछड्यांना जन्म दिलेला. त्यातील एका बछड्याचा २३ मेला मृत्यू झाला होता. त्यानंतर आज दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. तर, चौथ्या बछड्याची प्रकृती चिंताजनक असून, पालपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उष्माघाताने या बछड्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९१.२५ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
शिवरायांचा मावळा अवघा पाच वर्षांचा; सर केले सहा हजार फुट उंचीचे जॉर्ज एव्हरेस्ट शिखर
वय वर्षे अवघे पाच… ध्येय मात्र एव्हरेस्ट सर करायचे… एवढ्या कमी वयात तर ते शक्य नाही, मग काय आईवडिलांना त्याचा हट्ट मोडवेना. मग काय.. तर उत्तराखंडमधील मसुरतील सर्वात उंच जॉर्ज एव्हरेस्ट शिखरची चढाई करायचे ठरले. हा चिमुकला थकेल, हार मानेल असे त्याच्या आईवडिलांना वाटले, पण समुद्रसपाटीपासून ६ हजार ५७८ फूट उंचीचे हे शिखर त्याने लिलया सर केले.शिवराज हा सचिन आणि सुजाता कापुरे यांचा मुलगा. लहानपणापासूनच वेगळे काही करण्याची जिद्द असलेला. उत्तराखंडातील मसुरी येथे स्थित हा डोंगर मुलासह आईवडिलांनी देखील सर करण्याचा निश्चय केला. सायंकाळी चार वाजता ते जॉई एव्हरेस्टच्या पायथ्याशी होते. सोबत असलेल्या सर्व ‘ट्रेकर्स’मध्ये शिवराज हा सर्वात लहान. इतक्या उंचीवर मुलाला नका नेऊ, त्याला झेपणार नाही, असा सल्ला सारे देत होते. त्यामुळे आईवडिलांचा उत्साह मावळत असला तरी शिवराज मात्र, तेवढ्याच उत्साहाने समोरसमोर जात होता.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं सुरक्षा कवच अजून मजबूत, आता मिळणार Z प्लस सुरक्षा
मागच्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये वातावरण तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी गँगस्टरची हत्या करण्यात आली. पंजाबमधील अमृतपाल प्रकरणानंतर वातावरण पाहता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं सुरक्षा कवच अजून मजबूत करण्यात आलं आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून त्यांना अधिक सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत पंजाबमधील अनेक संशयास्पद लोकांच्या हालचाली केंद्रीय गुप्तचर संस्था IB च्या निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
“विज्ञानाची तत्वे वेदांमधून घेतली”, इस्त्रोच्या प्रमुखांचा मोठा दावा
बीजगणित, वर्गमुळे, वेळेचा सिद्धांत, स्थापत्यशास्त्र, धातूशास्त्र, अवकाश विज्ञानाचे सिद्धांत वेदांमधून घेतले असल्याचा मोठा दावा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी केला आहे. वेदांमधील हे सिद्धांत अरब देशांतून युरोपीय देशांत गेले. तेथील संशोधकांनी हे शोध आपल्या नावावर करून घेतले, असंही ते म्हणाले.इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ उज्जैन येथे महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वेदांबाबत हा मोठा दावा केला आहे. एस. सोमनाथ म्हणाले की, “शास्त्रज्ञांकडून संस्कृत भाषेचा वापर केला जात असे. संस्कृत भाषा लिखित नव्हती. परंतु, लोक एकमेकांचं ऐकून शिकत होते. त्यामुळे ही भाषा आजपर्यंत टिकली आहे.”
करण जोहरच्या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. करण जोहरच्या चित्रपटात अनेक नवे चेहरे पाहायला मिळतात. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्षिती जोगला करण जोहरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. करणच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटात क्षिती दिसणार आहे.‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे पोस्टर शेअर करत क्षितीने करण जोहरच्या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंग व आलिया भट्टसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. क्षितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटी व चाहत्यांनी आनंद व्यक्त करत क्षितीला शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी स्वबळावर लढणार – शेट्टी
राज्यातील सहा लोकसभा मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक स्वबळावर लढविणार असून कोणत्याही पक्षाशी आघाडी करायचाच नाही असा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी गुरूवारी सांगलीत पत्रकार बैठकीत सांगितले. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनमध्ये २ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या नांगरट साहित्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार बैठक आयोजित करण्यात आले होती. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उपस्थित होते.
शेतीसाठीच्या वीज पुरवठ्यावर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पाण्याविना पीकं जळल्याने अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच आता शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देऊ, असं जाहीर केलं. ते गुरुवारी (२५ मे) सोलापूरमध्ये भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात बोलत होते.
आशिष विद्यार्थींची वयाच्या साठीत बांधली दुसरी लग्नगाठ
हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून काम करणारे अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी लग्न केलं.वयाच्या 60व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं.दोघांनी कोर्ट मॅरेज केलं असून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत.रुपाली बरूआ या आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर आहेत.दिसायला देखण्या असेलल्या रुपाली स्वत:च्या ब्रँडसाठी त्या मॉडेलिंगही करतात. त्यांच्या सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटोशूट देखील पाहायला मिळतंय.
SD Social Media
9850 60 3590