कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतून जात आहेत. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे. यासोबत विद्यार्थ्यांकरिता जीवन विमा आणि अपघात विमा सुद्धा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला असून त्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परीक्षा शुल्क माफीची मागणी भाजपा युवा मोर्च्याकडून करण्यात आली होती. या निर्णयासाठी कुलगुरूंचे आभार पत्रकार परिषदेतून भाजपा युवा मोर्चाकडून मानण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांनी हाच विद्यार्थी हिताचा निर्णय महाराष्ट्रभर लागू करावा अशी मागणी केली. नागपूर विद्यापीठाचे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या 4 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
नागपूर भाजपाचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी महापौर संदिप जोशी, शिक्षण मंचाच्या अध्यक्ष कल्पना पांडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 मे, 2021 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाने नागपूर विद्यापीठाला काही मागण्याची पूर्तता जसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शुल्क माफी करण्याची विनंती केली होती. त्यात परीक्षा शुल्क, महाविद्यालयातील ऑनलाईन सत्रांचे शुल्क, महाविद्यालयीन विद्यार्थी वापरत नसलेली महाविद्यालयातील संसाधने जसे जिम, पार्किंग, लेबॉरेटरीज, इत्यादींचा समावेश आहे. काही महाविद्यालयांतील व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शुल्क पूर्ण भरले नसल्याने परीक्षा अर्ज भरण्याची परवानगी देत नव्हते म्हणून, यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना विविध हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, ही विनंती देखील यावेळी भाजप युवा मोर्चाने नागपूर विद्यापीठाकडे केली आहे.