सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथची यात्रा रद्द

देशातील सध्याची कोरोनाची स्थिती आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथची यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र भाविकांना 28 जूनपासून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ श्राईन बोर्डासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी सर्व विधी पार पाडले जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविणे जास्त गरजेचे आहे. भाविकांच्या आरोग्याचा विचार करता यात्रेचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही.

हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य ‘राजतरंगिणी’तमध्येही आहे. या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात.

अमरनाथ गुफा ही समुद्र सपाटीपासून 3,888 मीटर म्हणजेच सुमारे 12 हजार 756 फूट उंचावर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी एकतर पायीच जावं लागतं किंवा खेचरांचा आधार घ्यावा लागतो. दक्षिण काश्मीरमधील पहलगावपासून हे अंतर सुमारे 46 किमी आहे. म्हणजेच अमरनाथ गुहेपर्यंत तब्बल 46 किमी चालत जावं लागतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.