सरकारकडून कोरोना लसीचा पुरवठा न झाल्यामुळे पुणे शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरणाने मोठा वेग घेतला होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी लसीअभावी केंद्रं बंद ठेवावी लागणार आहेत.
इतर शहरांच्या तुलनेने पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर लस पुरवठा होत होता. मात्र, बुधवारी सरकारकडून लस प्राप्त न झाल्याने, आज (गुरुवार 1 जुलै) महापालिकेच्या केंद्रांवर होणारे लसीकरण पूर्ण बंद राहणार आहे.
दरम्यान कमला नेहरु रुग्णालयात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेकडील शिल्लक कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील प्रत्येक झोननिहाय एका रुग्णालयात आणि ससून रुग्णालयात आज कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मात्र उपलब्ध राहणार आहे. ज्यांनी 2 जूनपूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशांना 50 टक्के लस ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर 50 टक्के लस ही ऑन दी स्पॉट उपलब्ध असेल.
दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. तब्बल 51 टक्के झोपडपट्टीवासियांना लसीकरणामुळे आरोग्याला धोका निर्माण होईल अशी भीती वाटते, तर लसीकरणाबाबत चुकीची आणि अर्धवट माहिती मिळाल्याने 30 टक्के नागरिक लसीकरणापासून लांब राहिले आहेत, अशी चिंताजनक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. आकांक्षा फाउंडेशन, टिच फॉर इंडिया आणि आय टिच स्कूल्स या संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं होतं. एकीकडे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याच्या निर्णयाचे स्वागत होत असताना दुसरीकडे या भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.