आज दि.४ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

नवरात्रोत्सवात गरबा,
दांडियाच्या आयोजनावर बंदी

येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत.

‘जलयुक्त शिवार’ बंद केल्यामुळे महापूर, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ‘भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती. त्यामुळे नद्यांचे खोलीकरण करण्यात आले होते. पण, आज योजना बंद केल्यामुळे नद्यांचा महापूर आला’, असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. करजखेडा गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जखेडा गावातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली.

पुढील ४ ते ५ दिवसात राज्यात
जोरदार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ ते ५ दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे . ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

कृषी कायदाच लागू नाही तर
आंदोलन कोणाच्या विरोधात

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. किसान महापंचयीतने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, यावर आज सुनावणी झाली. सध्या कृषी कायदाच लागू नाही तर किसान पंचायत कोणाच्या विरोधात आंदोलन करणार? कायद्याला स्थगिती आहे. मग विरोध कशासाठी असा सवाल सुप्रीम कोर्टानं किसान महापंचायला विचारला आहे.

लखीमपूर शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना
४५ लाख रुपयांची भरपाई देणार

उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरी येथील आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला असून हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असून जखमींना १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल. पीडितांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल, अशी घोषणा योगी सरकारने केली आहे.

त्या क्रूझ वर आणखी
ड्रग्ज सापडले

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या घटनेचे पडसाद रविवारी दिवसभर उमटल्याचं दिसून आलं. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु केली आहे. यानंतर आता आणखी आणखी आठ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीने सोमवारी सकाळी मुंबईला परतलेल्या क्रूझची झडती घेतली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणखी ड्रग्स जप्त करण्यात आले असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शाळेचे नाही तर मुलांच्या भविष्याचं,
प्रगतीचं दार उघडतो आहोत : मुख्यमंत्री

आज राज्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबजून गेल्यात, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. शाळेचे नाही तर आज आपण मुलांच्या भविष्याचं, विकासाचं, प्रगतीचं दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.”

नीट परीक्षा पुन्हा घेण्याची
मागणी करणारी याचिका फेटाळली

सप्टेंबर महिन्यामध्ये १२ तारखेला पार पडलेली राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) रद्द ठरवून पुन्हा नव्याने ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना ही परीक्षा देणारे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने असल्याचं सांगत त्या तुलनेत ज्या पाच तक्रारींच्या जोरावर याचिका दाखल करण्यात आलीय त्या फारच नगण्य असल्याचं निरिक्षण नोंदवत याचिका फेटाळल्याचं बार बेंचने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

तालिबानचा आयएसआयएस
खुरासानच्या तळांवर हल्ला

काबूलमध्ये रविवारी ईदगाह मशिदीबाहेर झालेल्या स्फोटानंतर तालिबानने संताप व्यक्त केला आहे. या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तालिबानने आयएसआयएस खुरासानच्या तळांवर हल्ला केलाय. तालिबानने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार संघटनेच्या तरुणांनी मशिदीबाहेर स्फोट झाल्यानंतर काही तासांमध्येच काबूलमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर हल्ले करुन अनेक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केलाय. एएफपीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.