आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलंय. वारीला परवानगी देण्याची मागणी करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं. मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केलीय. तसंच दारुच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलीस अडवत नाहीत. पण विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड केला जातोय, असंही संभाजी भिडे यांनी म्हटलंय.
आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मानाच्या 10 पालख्यांना 100 वारकऱ्यांसह बसमधून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संभाजी भिडे यांनी वारकरी आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं आहे. त्यात पायी वारीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आलीय. वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे, त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.
कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद, असं संभाजी भिडे म्हणाले.
कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरु आहे. दोन सरकार जबाबदार – जे जगायचे ते जागतील, जे मारायचे ते मारतील. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील, असंही संभाजी भिडेंनी नमूद केलं.