हिंदू धर्मात गाईला माता म्हटले जाते. हिच भावना ठेवून एका कुटुंबाने गाईचा अंत्यविधी माणसांसारखा केला आहे. मध्य प्रदेशमधील बीना येथील गायीच्या मृत्यूने शिवाजी वॉर्डातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली होती. आपली लाडकी सुदामा गाय आता राहिली नाही हे परिसरातील लोकांना समजताच त्यांनी दुःखी अंत:करणाने अंतिम निरोपाची तयारी सुरू केली. लोकांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सुदामा गायीचा अंत्यसंस्कार केला.
बीना येथील शिवाजी वॉर्डातील कमली राय यांच्या घरी गेल्या 18 वर्षांपासून कुटुंबाप्रमाणे गायीचे पालनपोषण केले जात होते. लोक तिला प्रेमाने ‘सुदामा’ म्हणत. विशेष म्हणजे कुटुंबासोबतच शिवाजी वार्डातील लोकही सुदामा गायीशी जोडले गेले होते.
या गायीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. लोकांनी ठरवले की सुदामा ज्या प्रकारे कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहिली त्याचा निरोपही असाच होईल. सर्व विधींच्या तयारीनंतर, सजवलेल्या सुदामा गायीला हातगाडीतून मुक्तीधाम येथे आणण्यात आले, जिथे प्रभागातील रहिवाशांनी तिला अखेरचा निरोप दिला.गायीच्या शेवटच्या प्रवासापूर्वी परिसरातील सर्वांनी सुदामाचे आशीर्वाद घेतले आणि तिला साडी पांघरून सर्वांनी देवाला शांती मिळावी अशी प्रार्थना केली. येथून निघाल्यानंतर जेसीबीद्वारे खड्डा खोदून गायीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथेही सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून सुदामाला श्रद्धांजली वाहिली. सुदामा गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे जे तिच्यासारखे दिसतात. कमली राय यांनी सांगितले की, सुदामा आमच्या कुटुंबासाठी आईसारखी होती.
जेव्हापासून सुदामा गाय आमच्या कुटुंबातील सदस्य झाली, तेव्हापासून आमच्या कुटुंबातील अनेक सदस्य तिचे दूध पिऊनच मोठे झाले. सुदामा गाईच्या दुधावर कुटुंबातील अनेक सदस्य वाढले आहेत, त्यामुळे आईच्या दुधाचे ऋण आम्ही फेडू, अशी शपथ घेतली होती.ते पुढे म्हणाले, ‘आमच्या गाईचे नाही तर आईचं निधन झालंय. त्यामुळे तिच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.