इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378 रनचं आव्हान होतं, पण तेदेखील इंग्लंडने अगदी सहज पार केलं. या विजयासह इंग्लंडने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. या सीरिजच्या पहिल्या 4 टेस्ट मागच्या वर्षी झाल्या होत्या, पण टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पाचवी टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. ही टेस्ट आता खेळवण्यात आली.
मागच्या वर्षी टीम इंडिया सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर होती तेव्हा रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. यावेळी राहुल द्रविडच्या प्रशिक्षणात टीम इंडिया खेळत होती. राहुल द्रविडने कोचिंगची जबाबदारी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव जाणवत आहे, ज्यामुळे आता द्रविडवर टीका होऊ लागली आहे.
मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला, त्यानंतर राहुल द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली. द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टेस्टमध्ये टीमच्या पदरी फार यश अजून तरी आलं नाही. न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली तेव्हा टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 1-0 ने विजय झाला, पण कानपूरची टेस्ट ड्रॉ झाली होती. या टेस्टमध्ये टीम इंडियाने उशीरा डाव घोषित केला, त्यामुळे किवी टीमला मॅच ड्रॉ करण्यात यश आलं. टीम इंडियाच्या उशीरा डाव घोषित करण्याचं खापर तेव्हा द्रविडवर फोडण्यात आलं.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही टीम इंडिया पहिली टेस्ट जिंकली होती, पण पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये टीमच्या पदरी निराशा आली आणि 2-1 ने पराभव झाला. नव्या खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्याच घरात पराभव करण्याची संधी टीम इंडियाला चालून आली होती, पण यातही टीमला अपयश आलं. मार्च 2022 मध्ये घरच्या मैदानात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मात्र टीम इंडियाचा 2-0 ने विजय झाला होता.
रवी शास्त्री कोच असताना भारताने परदेशामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात दोनदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडमध्ये आघाडी घेतली होती. राहुल द्रविडला मात्र सुरूवातीला असं यश मिळवता आलेलं नाही.