मुकेश अंबानीची मोठी घोषणा; रिटेल व्यवसाय प्रमुखपदी ईशा अंबानीची नियुक्ती

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानी हिचा समूहाच्या रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणून ओळख करुन दिली. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश याला समूहाची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते.

मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये व्यवसायाची वाटणी

६५ वर्षीय मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. ईशा आणि आकाश हे जुळी भावंडे आहेत, तर अनंत सर्वात लहान आहे. ईशाने पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे. रिलायन्स समूहाचे तीन मुख्य व्यवसाय आहेत, यामध्ये तेल शुद्धीकरण आणि पेट्रो-केमिकल्स, रिटेल व्यवसाय आणि डिजिटल व्यवसाय (टेलिकॉमचा) समावेश आहे. यापैकी किरकोळ आणि डिजिटल व्यवसाय पूर्ण मालकीच्या संस्थांखाली आहेत. तर तेल ते केमिकल व्यवसाय रिलायन्स अंतर्गत येतो. नवीन ऊर्जा व्यवसाय देखील मूळ कंपनीचा भाग आहे. मुकेश अंबानी तेल आणि ऊर्जा व्यवसाय त्यांचा धाकटा मुलगा अनंत याच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी निवृत्त होणार?

मुकेश अंबानी यांनी रिटेलची कमान ईशाकडे दिली आहे आणि एनर्जी बिझनेसची कमान धाकटा मुलगा अनंतकडे दिली आहे. मोठा मुलगा आकाश याला आधीच समूहाच्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, या नियुक्तीनंतर मुकेश अंबानी यांनी आपण अद्याप निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते पूर्वीप्रमाणेच ग्रुपमध्ये सक्रिय राहणार आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी याबाबतचे संकेत दिले होते.तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, तिन्ही मुले आधीच समूहाच्या सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. जूनमध्ये अंबानी यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.