आनंदी आणि यशस्वीपणे जीवन जगण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असून ते करता येते असे मुंबई येथील वेलनेस कोच व वक्ते धर्मेश शाह यांनी प्रतिपादन केले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल व एस.डी.इव्हेंटस् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "तणाव मुक्त और सफलता की जिंदगी" या एक दिवसीय मोफत कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन ढाके, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष विपुल पारेख, सहसचिव दिनेश थोरात, संतोष बरडे, बाळासाहेब सुर्यवंशी, चंद्रशेखर महाजन, आकांक्षा कुळकर्णी, दयालाल पटेल, महेंद्र गांधी, श्रीधर इनामदार, संदीप सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना धर्मेश शाह यांनी तणाव म्हणजे नकारात्मक विचारांचे मिश्रण असे सांगून दरवर्षी 7 लाख व्यक्ती आमहत्या करतात. रक्तदाबाचे रुग्ण देखील वाढत असल्याचे सांगितले. भूतकाळ व भविष्याची काळजी यामुळे गरज नसलेले विचार येतात व तणाव वाढतो. मेंदू आहे तर विचार येणार, दररोज प्रत्येकाला 60 ते 65 हजार विचार येतात. विचार मुक्त जीवन शक्यच नाही. मात्र विचारांची संख्या कमी करता येऊ शकते त्यामुळे तणाव कमी होऊ शकतो असे मत शाह यांनी मांडले.
पुढे बोलतांना त्यांनी मेंदूच्या बीटा अल्फा, थिटा, डेल्टा या चार अवस्था सांगून जशी मनाची स्थिती तशी परिस्थिती निर्माण होते. ध्यान, योगा, संत्सग यांची माहिती सांगून डिप्रेशन, मुड याविषयी विश्लेषण केले. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी विचार कमी, चांगली झोप, दिव्याच्या ज्योतीकडे एक मिनीट पाहणे, श्वास घेणे-सोडणे, निरिक्षण करणे, आनंद देणारी ॲक्टीव्हीटी करणे, प्रवचन, व्याख्यान ऐकणे, यज्ञ कार्यात सहभागी होणे, गो-शाळेत काही तास जाणे, सुर्यप्रकाश घेणे, घरात खेळती हवा व सुर्यप्रकाश असावा, जुनी गाणे ऐकावी, चालणे, निसर्गात भम्रंती करणे, पशु-पक्षी, प्राणी यांना पाळण्याऐवजी त्यांची सेवा करावी, आनंद घ्यावा, चांगल्या आनंदी व्यक्तींच्या संपर्कात राहावे अशी विविध टीप्स वैज्ञानिक माहिती व रिपोर्टससह उपस्थितीतांना समजावून सांगितल्या.
यशस्वीतेसाठी सोनाली शाह, जयेश खोना, भावना खोना (मुंबई) रोटरी सेंट्रलचे मानद सचिव रविंद्र वाणी, नेहा उंबरकर, डॉ. दिपक पाटील, ॲड. कालिंदी चौधरी, तनुजा तळेले, विनोद चौहाण, जयेश पाटील, उमेश पाटील आदिंनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील 145 व्यक्तींनी सहभाग घेतला.
Post Views: 232