राज्यात अवकाळी पावसाचं
संकट ; थंडी देखील वाढणार
राज्यात अवकाळी पावसाचं संकट आणि वाढणारी थंडी बदललेल्या वातावरणामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे. तर अवकाळी पावसामुळे बळीराजावर संकट ओढवलं आहे. काल संध्याकाळी मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ पाहायला मिळाली. राज्यातील काही ठिकाणी आजही हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे संकट ओढवलं आहे.
स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू
करण्याचा निर्णय घेतला जाईल : राजेश टोपे
राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली. राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय.
तलवार आजही आमच्या हातात
आहे हे लक्षात ठेवा : संजय राऊत
महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी ? महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज शौर्याचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रवादाचं प्रतिक आहे. मोगलांविरुद्ध, आक्रमकर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली, त्यांनी हिंदूंचे रक्षण केलं, हिंदू महिलांना संरक्षण दिलं, हिंदू मंदिरांचं रक्षण केलं म्हणून जर कोणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत असेल तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा,” असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.
आमच्या दबावामुळे नेताजींचा
पुतळा उभारला : ममता बॅनर्जी
दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. दरम्यान, आमच्या सरकारने निर्माण केलेल्या दबावामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीतील इंडिया गेटवर उभारला जात आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. “आमच्या दबावामुळे हा पुतळा उभारला जात आहे. परंतु पुतळा उभारल्याने तुमची जबाबदारी संपत नाही,” असे ममता बॅनर्जी केंद्र सरकारला म्हणाल्या.
केरळ राज्यामध्ये
लॉकडाऊन सुरू
केरळात कोरोनाचा संसर्ग (Corona) दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन एकदिवसीय आहे. म्हणजेच रविवारपुरताच मर्यादित आहे. लॉकडाऊनमधून फक्त अत्यावश्यक सेवांनाच सूट दिली आहे
रोहित पाटील यांना लवकरच
राष्ट्रवादी पक्षात मोठं पद मिळेल
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी आपली छाप सोडली आहे. रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे. एकीकडे शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, एकनाथ खडसेंसारख्या नेत्यांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलं असताना रोहित पाटील यांना मात्र सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं. त्यांच्या याच यशामुळे त्यांना लवकरच राष्ट्रवादी पक्षात मोठं पद मिळेल असं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंबंधी सूचक विधान केलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भारतातील सर्वात उंच व्यक्ती
धर्मेंद्र प्रताप सिंग समाजवादी पक्षात
भारतातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. धर्मेंद्र प्रताप सिंग उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून असून त्यांची उंची २.४ मीटर म्हणजेच ८ फूट १ इंच इतकी आहे. वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांची उंची ११ इंचाने कमी आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
IPL 2022 पासून मिचेल स्टार्क
ख्रिस गेल लांबच
आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) क्रिकेट चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे. हळूहळू या ऑक्शनशी संबंधित माहिती समोर येत आहे. क्रिकबजच्या (cricbuzz) मते, इंग्लंडच्या बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जो रूट यांनी त्यांची नावे आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनसाठी पाठवली नाहीत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही या लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलनेही लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही.
2023 पर्यंत पुष्पा 2 प्रदर्शित
होण्याची शक्यता
पुष्पा 2′ चे शूटिंग जवळपास 250 दिवस चालणार आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाचे शूटिंग 210 दिवस चालले. त्यामुळे शूटिंगवरच त्याचे प्रदर्शन निश्चित केले जाणार आहे. मधेच कोरोनामुळे लॉकडाऊन असेल किंवा काही अडचण आली तर चित्रपट प्रदर्शित होण्यास वेळ लागू शकतो. 2023 पर्यंत पुष्पा 2 प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
म्हाडाच्या ऑनलाईन
परीक्षेसाठी तारखा जाहीर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून विविध पदांसाठीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. म्हाडाकडून अखेर परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलंय. म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीनं राबवली जात आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. परीक्षेत गैरप्रकाराचा संशय आल्यानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या वेळी लेखी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेण्याचं ठरवलं होतं.
लोकप्रिय नेत्यांच्या यादीत
पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी 71 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांसारखे नेतेही लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्या मागे आहेत. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 66 टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर, तर इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी तिसऱ्या क्रमांकावर 60 टक्के रेटिंगसह आहेत.
क्रिशा शाह लवकरच
अंबानी कुटुंबाची सुन होणार
व्यवसायाच्या क्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत असणारे कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंब. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणानी नेहमीच चर्चेत असतो. आता या कुटुंबात आणखी एका सदस्य जोडला जाणार आहे. जी लवकरच अंबानी कुटुंबाची सुन होणार आहे. उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानी लवकरच लग्न करणार आहे. त्याचा क्रिशा शाहसोबत नुकताच साखरपू़डा देखील पार पडला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
SD social media
9850 60 35 90