पालक आपल्या मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. नंतर त्या पूर्ण करण्यासाठी मुलाला त्रास देतात. तसेच स्वत:ही त्रास करुन घेतात. अशीच काहिशी घटना नाशिकमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. मुलगा अभ्यास करत नाही म्हणून महिलेने संतापात त्याची हत्या केली. नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघड झाली आहे.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान, मुलाचा खून करुन महिलेने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा सागर पाठक (वय 32) यांनी सोमवारी (9 ऑगस्ट) त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आईला मुलाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र मुलगा अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महिलेने सुसाईट नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
संबंधित घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. मात्र माझ्या मृत्यूला कोणालाही जवाबदार धरु नये, असं या सुसाईड नोटमध्ये मृतक महिलेने म्हटलं आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. (फोटो क्रेडिट गुगल)