पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादात आता युवा सेनेनं उडी घेतली असून, रानडे इन्स्टिट्यूटच्या मुद्द्यावरुन त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. रानडे इन्स्टिट्यूटच्या मोक्याच्या जागेवर शॉपिंग सेंटर बांधण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेनं केलाय. आमचा या निर्णयाला विरोध आहे. कुलगुरूंनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
डेक्कन परिसरात असणारं रानडे इन्स्टिट्यूट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र, या स्थलांतरावरुन रानडे इन्स्टिट्यूटचं महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी केलाय. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप इन्स्टिट्यूट बचाव कृती समितीनं केला आहे.
रानडे इन्स्टिट्यूट हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलाय. त्याला आता मोठा विरोध होत आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर करून त्याच्या जागेवर काही लोकांचा डोळा असल्याचा आरोप केला जातोय. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या जागेची किंमत साधारण 400 कोटी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर केलं तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी कृती समितीने दिलाय. दरम्यान 15 दिवसात यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेऊ असं आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले.
रानडे इन्स्टिट्यूटमधील जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग मोठी परंपरा आहे. हा विभाग देशभरातील पत्रकारितेत आघाडीचा विभाग मानाला जातो. मात्र आता याच रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतरणाचा घाट विद्यापीठाने घातलाय. या स्थलांतरणाला इन्स्टिट्यूटच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलाय. कसल्याही परिस्थितीत रानडेचे स्थलांतर होऊ देणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय.
रानडे इन्स्टिट्यूटमधील जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विभागाचे स्थलांतर करुन ते पुणे विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागात विलनिकरण करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचे असणारे स्वतंत्र अस्तित्व पुसलं जाणार असा आरोप आजी-माजी विद्यार्थ्यांनी केलाय. शिवाय रानडे इन्स्टिट्यूटची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा बिल्डरांच्या घशात घालायचा विद्यापीठाचा डाव असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेची किंमत साधारण 400 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. या जागेवर अनेक बिल्डरांचा डोळा असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. (फोटो क्रेडिट गुगल)