आज दि.६ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचंही म्हटलं आहे.

कुस्तीपटू बजरंग पुुनिया
सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला आहे. बजरंगचा सामना तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अझरबैजानच्या हाजी अलीवशी झाला. या सामन्यात अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले. याआधी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी भारतासाठी रौप्यपदक जिंकले.

अनिल देशमुख यांच्या
महाविद्यालयावर छापा

ईडीनं अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरूच ठेवली आहे. आज दुपारी ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे. यासोबतच, ईडीनं नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर
चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरु होती. दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी सकाळी साडेअकरा वाजता राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.

कोकणात जाण्यासाठी
४० विशेष रेल्वे गाड्यांची सेवा

गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेने मोठी खुशखबर दिली आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आता रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वे एकूण ४० विशेष रेल्वे गाड्यांची सेवा गणेशोत्सवात देणार आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणात आणि कोकणातून पुन्हा मुंबईत येण्यासाठी भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमवर गेल्या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले.

नवे पीक येईपर्यंत महागाईतून
दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

कोरोना संकटामुळे मिळकत घटत असताना दुसरीकडे महागाईचा दर वाढलेला दिसत आहे. या दुहेरी संकटात पिचलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्याने महागाईच्या भडक्यात तेल पडले आहे. तेलाच्या किंमती भडकल्याने महागाई वाढल्याचे सरकारने संसदेत मान्य केले आहे. नोव्हेंबरला नवे पीक येईपर्यंत महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पेगसस प्रकरणातील सत्य समोर
यायला हवं : सर्वोच्च न्यायालय

इस्राईलच्या पेगसस स्पायवेअरचा वापर करुन हेरगिरी केल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचं म्हणत यातील सत्य समोर यायल हवं असं मत नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 9 याचिकांवर सुनावणी केली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण म्हणाले, पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर आहेत यात कोणतीही शंका नाही.

नवीन कसारा घाटात ट्रक
१०० फूट खोल दरीत कोसळला

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा ट्रक आज पहाटे ४ वाजता १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने भरपावसात घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ४ ते ७ पर्यंतच्या अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या ३ जणांना सुखरूप बाहेर काढले तर १ जण जागीच ठार झाला. MH 12 HD 8355 हा ट्रकचा वाहन क्रमांक आहे. या अपघातात वाहनचालक गोकुळ शिवाजी बोडके वय ३१ रा. नासिकरोड हे जागीच ठार झाले.

देशात अ‍ॅक्टिव्ह
केसेस पुन्हा वाढल्या

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 44 हजार 643 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 464 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार 96 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो
संयम सोडू नका : मुख्यमंत्री ठाकरे

ज्या ठिकाणी निर्बंधामध्ये शिथिलता द्यायची त्या ठिकाणी ही शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ कोणी लाडका आहे आणि कोणी दुश्मन आहे असं नाही, असं सांगतानाच राज्यातील नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.