आज दि. २१ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा

galati/sdnewsonline.com

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती
तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये बुधवारी घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेमध्ये तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. छगन भुजबळ यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “ही अतिशय दु:खद घटना असून कोरोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणं हे अतिशय दुर्दैवी आहे”, असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

नाशिक घटनेबाबत
पंतप्रधानांना दुःख

नाशिकमध्ये आज दुपारच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात टँकरमधून ऑक्सिजन गळती होण्याची धक्कादायक घटना घडली. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच दुसरीकडे ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांना प्राण गमावावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात देशाच्या पंतप्रधानांबरोबरच गृहमंत्री अमित शाह यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. शाह यांनी ट्विटरवरुन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात खेद व्यक्त केलाय.

दुःख व्यक्त करण्यासाठी
माझ्याकडे शब्द नाहीत : मुख्यमंत्री

नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू ? त्यांचे अश्रू कसे पुसू ? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या दुर्दैवी घटनेचे राजकारण कुणीही करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

raj thakeray/sdnewsonline.com

बेपर्वाई झाली असेल तर
कडक शासन व्हायलाच हवं

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं,” असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात कडक
लॉकडाउन लागणार

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तर कोरोना संक्रमणाचा प्रसार कमी झालेला नाही. करोना रुग्णवाढ कायम असून, मृतांची संख्या वाढत असल्यानं काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक लॉकडाउनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाउन शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार काय करणार याकडे लक्ष लागलं होतं. पण, राज्यात कडक लॉकडाउन लागणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

अंबाजोगाई ऑक्सिजन पुरवठा
खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशीच घटना घडल्याचं वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर नातेवाईकांनी केलेला आरोप रुग्णालयने फेटाळून लावला आहे.

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकात
शाब्दीक बाचाबाची

मुखेड उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रुग्णाच्या नातेवाईकात शाब्दीक बाचाबाची होऊन एका नातेवाईकाने दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करून डॉक्टर व परिचारिकेलाही धमकी दिल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून
हकालपट्टी करा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नसल्याचं सांगितल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेत नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

जवाहरलाल नेहरु इंचार्ज
नाहीत, नरेंद्र मोदी आहेत

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरही त्यांनी नाराजी जाहीर केली आहे. केंद्र सरकार दुसऱ्या कोणावर आरोप ढकलू शकत नाही अशा शब्दांत त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सुनावलं आहे. देश संकटात असताना विरोधकांच्या सूचनांचा स्वीकार करायला हवा होता असंही मत त्यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकार इतर कोणावर आरोप ढकलू शकत नाही. जवाहरलाल नेहरु इंचार्ज नाहीत, नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाचं रक्षण केलं पाहिजे,” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.


टाटा ग्रुपचा २४ ऑक्सिजन वाहक
सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय

रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवहानानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.