नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. मात्र यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
महापालिकेच्या नोडल अधिकाऱ्याने एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “दुरुस्तीचं काम सध्या सुरु आहे. ऑक्सिजनची मागणी कमी असावी यासाठी काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवलं जात आहे. टाकी अर्धी झाल्यानंतर टँकरमधून पुन्हा ती भरली जाते. यावेळी हा प्रकार घडला”. रुग्णालयात सध्या १३० रुग्ण असून १५ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.