सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसला आहे. आतापर्यंत विद्यापीठातील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. या विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सुरक्षित होते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये शासनाचे आदेश येईपर्यंत विद्यीपाठातील कामकाज जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्याच काळात अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. विद्यापीठातील जे कुटुंब बाधित झाले आहे त्यांच्यासाठी गेस्ट हाऊसमधील रूम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यातील 12 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत ही रुग्णसंख्या घटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात नागरिक, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील ज्या 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, त्यात औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तसंच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं.