सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसचे अस्तित्त्व धोक्यात

पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पराभवाचा पाढा गिरवताना दिसला. त्यामुळे आता देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अस्तित्त्व धोक्यात आल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या काही वर्षांमधील आकडेवारी पाहिल्यास अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत होताना दिसत आहे. गेल्या सात वर्षांमध्ये काँग्रेसने जवळपास सहा राज्यांमध्ये विरोधी पक्षाची जागाही गमावली आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसपेक्षा अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या पुदुच्चेरीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. पुदुच्चेरीत तर काँग्रेस पाच वर्षांपासून सत्तेत आहे. तरीही काँग्रेसला 30 पैकी अवघ्या दोन जागांवर विजय मिळवता आला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर विविध राज्यांमध्ये काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात झाली. अनेक नेते पक्ष सोडून गेले. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांत काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. तर त्रिपुरामध्ये 2018 साली भाजपने डाव्यांचा गड उद्ध्वस्त केला. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसची विरोधी पक्षनेतेपदाची जागाही हिसकावून घेतली.

महाराष्ट्रातील 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्ष चौथया क्रमांकावर फेकला गेला. केवळ महाविकासआघाडीची सत्ता आल्यामुळे काँग्रेस याठिकाणी सरकारमध्ये आहे. मात्र, या सरकारमध्ये काँग्रेसच्या शब्दाला म्हणावी तशी किंमत नाही. तर तामिळनाडूतही काँग्रेस अद्याप द्रमुकचा लहान भाऊच आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आता प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी युती करायलाही तयार होती की नाही, अशी अवस्था आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.