अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा मायबाप म्हणून विठेवर उभा असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात. विठूरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालून पंढपूरात पोहोचतात. तर विठ्ठलावर निस्वार्थ श्रद्धा असलेले काही भाविक विठ्ठलाच्या चरणी दाण करतात. अशाच एका सर्वसामान्य भाविकाने विठ्ठलाच्या चरणी तब्बल 1 कोटी रूपयाचं दान केलं आहे.
मुंबईत राहणाऱ्या एका सामान्य विठ्ठल भक्ताने विठ्ठलाच्या चरणी चक्क 1 कोटी रूपयांची देणगी दिली आहे. या भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही देणगी दिली आहे. मंदिर समितीच्या इतिहासात प्रथमच भाविकाने एवढ्या मोठ्या रकमेची देणगी दिली आहे.
या भक्ताने मोठी देणगी दिल्यानं मंदिराच्या उद्धारासाठी मोठा आधार मिळू शकतो.
मुंबईत राहणाऱ्या या विठ्ठल भक्ताचं नुकतंच कोरोनामुळं निधन झालं. त्यानंतर त्याला इन्शुरन्स कंपनीकडून काही पैसे मिळाले. भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्याच्या कुटूंबियांनी ही रक्कम विठ्ठल मंदिराला देणगी स्वरूपात दिली आहे. देणगी देताना त्यांनी भक्ताचं नाव गुप्त ठेवण्याची अट घातली. त्यांची ही अट मंदिर समितीने मान्य केल्यानंतर कुटूंबीयांनी विठ्ठलचरणी देणगी अर्पण केली आहे.
दरम्यान, गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या पाश्वभूमीवर विठ्ठल रूक्मिणीची मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. तर आषाढी एकादशीच्या दिवशी देखील भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात यावं अशी मागणी आता करण्यात देखील येत आहे.