बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या त्याच्याजवळ एकापेक्षा एक चित्रपट आहेत. त्यातीलच एक चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तो चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘भूल भुलैय्या 2’ होय. 20 मे रोजी प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन-कियारा आडवाणी स्टारर ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे. चांगल्या ओपनींगनंतर, अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाने प्रत्येक दिवसागणिक बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चित्रपटाच्या बंपर यशानंतर निर्माते भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘भूल भुलैया 2’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन सादर केलं आहे. या पोस्टनुसार चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ‘भूल भुलैया 2’ ने रिलीजच्या चौथ्या आठवड्यात मंगळवारी 1.29 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशा प्रकारे चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई 173.76 कोटींवर पोहोचली आहे. अजूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे, जितका सुरुवातीला होता.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सव्वा दोनशे कोटींचा टप्पा गाठणाऱ्या ‘भूल भुलैया 2’ने जगभरात 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला असून, अशी कामगिरी करणारा हा या वर्षातील दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.तर दुसरीकडे गंगूबाई काठियावाडी, सम्राट पृथ्वीराज आणि बच्चन पांडे यांसारख्या बिग बजेट चित्रपटांना मागे टाकलं आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धम्माल करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘भूल भुलैया’ हा चित्रपट 2007 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही चांगलं यश मिळालं होतं. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, राजपाल यादव, अमिषा पटेल, आणि शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होते.कार्तिक आर्यनचा हा चित्रपट याच चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यांनतर आता निर्माते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी करत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.