बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याला महागड्या सुपर बाईक फार आवडतात. जॉनने आपल्या याच आवडीमुळे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. आजही जॉन आपल्या सुपर बाईकवरुन बर्याचदा मुंबईत फिरताना दिसतो. मात्र, याच बाईकच्या वेडापायी अभिनेत्याविरोधात एकदा अपघाताची नोंद देखील करण्यात आली होती. 2006 मध्ये जॉन अब्राहमवर बेशिस्तपाने आणि वेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2006 मध्ये जॉन अब्राहमच्या गाडीने अतिशय वेगाने दोन जणांना धडक दिली होती. या अपघातात रस्त्यावर चालणारे लोकही किंचित जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम 279 (सार्वजनिकपणे वाहन चालवणे किंवा वेगवान वाहन चालविणे) आणि 337 (इतरांच्या जीवाला धोका पोहचवणारी किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेला इजा पोहचवणारी कारवाई) या कलमांतर्गत तक्रार दाखल केली.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान जॉनने कोर्टाला सांगितले की, ज्या लोकांना दुखापत झाली आहे त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तो एक छोटासा अपघात होता. मात्र, 2010 मध्ये ट्रायल कोर्टाने जॉनला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटकदेखील केली होती.
पण, जॉनने हार मानली नाही आणि अभिनेत्याने या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकरणी जामिनासाठी मागणी केली. जॉनला येथे दिलासा मिळाला होता. याप्रकरणी हायकोर्टाचे न्यायाधीश आर.सी.चव्हाण यांनी जॉनच्या सुटकेचे आदेश दिले. यासह, त्याला 20,000 रुपये जामीन देण्याचे आदेश देण्यात आले होते.
आपल्या या निर्णयामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, पीडितांना केवळ साध्या जखमा झाल्या आहेत आणि आरोपी संपूर्ण जामिनावर बाहेर राहिला आहे, याची जाणीव ठेवून त्याला जामिनावर सोडले जाऊ शकते. या संपूर्ण अपघातानंतर जॉन अब्राहम स्वत: या पीडितांना दवाखान्यात घेऊन गेला होता आणि त्यांच्यावर औषध उपचार केले होते. हे प्रकरण 2006मध्ये घडले होते. परंतु, या प्रकरणात 2012 मध्ये निर्णय घेण्यात आला होता.