फ्रान्सचं मॅगझिन ‘शार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा नव्या वादात सापडलं आहे. या मॅगझिनने कोविडच्या संकटावरून हिंदू देवी-देवतांचा अवमान केला आहे. त्यामुळे सोशल मीडियातून या मॅगझिनविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
‘शार्ली हेब्दो’ने एक कार्टुन प्रसिद्ध केलं होतं. त्यात भारतात ऑक्सिनजचा तुटवडा असल्याबद्दल टीका केली होती. 28 एप्रिल रोजी हे कार्टुन प्रकाशित करण्यात आलं होतं. जमिनीवर पडून भारतीय लोक ऑक्सिजनसाठी तडफडत असल्याचं या कार्टुनमध्ये दाखविण्यात आलं होतं. त्यात हिंदू देवी-देवतांचीही खिल्ली उडवण्यात आली होती. 33 कोटी देवी-देवता, पण एकातही ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता नाही, असं कॅप्शन देऊन या मॅगझिनने हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवली होती.
गुरुवारी ट्विटरवर शार्ली हेब्दो ट्रेंडिगमध्येही होता. अनेकांनी हे कार्टुन अवमानकारक असल्याचं सांगून शार्ली हेब्दोवर बंदीची मागणी केली आहे. तर अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत या कार्टुनचं समर्थनही केलं आहे. माणिक जॉली यांच्या ट्विटर हँडलवरून हे कार्टुन ट्विट करण्यात आलं आहे. डियर शार्ली हेब्दो, आमच्याकडे 33 कोटी देव आहेत. हिंमत न हारण्याचं ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि फ्रेंच नागरिकांचा सन्मान करतो. चिंता करू नका. तुमच्या कार्यालयावर किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला जाणार नाही, असं जॉली यांनी म्हटलं आहे.
तर दुसऱ्या एका यूजर्सने 33 कोटी देव निसर्गात आहेत. परंतु भारतीय समाज तुमच्या सारख्या देशांपासून प्रेरणा घेऊन वृक्षतोड करत आहे. आम्ही तर वृक्षांनाही देव मानतो, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. एका यूजर्सने तर शार्ली हेब्दोची चूक दाखवू दिली आहे. आमच्या देवतांची संख्या तुम्ही 330 मिलियनवरून 3 कोटी 30 लाख केली आहे. त्याचा मी तीव्र निषेध करतो, असं या यूजर्सने म्हटलं आहे. तुमच्या या कार्टुनने आम्ही दुखावलो नाही. तुम्हाला जे छापायचं ते छापा. त्याने आम्हाला फर्क पडत नाही. फक्त एक लक्षात ठेवा ते 33 मिलियन नाहीत तर 33 कोटी आहेत, असं या यूजर्सने म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील ब्रजेश कलप्पा यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेव्हा शार्ली हेब्दोने इस्लामविरोधातील कार्टून तयार केलं होतं. तेव्हा भाजपच्या आयटी सेलने आनंदोत्सव साजरा केला होता. आता काय होणार?, असा खोचक टोला कलप्पा यांनी केला आहे. एका यूजर्सनेही मी फ्रान्स आणि शार्ली हेब्दोच्या बाजूने आहे. शार्ली हेब्दो अभिव्यक्तिच्या स्वातंत्र्यासाठी ओळखले जाते. ते त्यांचं काम करत आहेत, असं या यूजर्सने म्हटलं आहे