जन्म. २९ मे १९५४ लुधियाना येथे.
१९८० ते १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी जबान सँभाल के या विनोदी मालिकेद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी महात्मा गांधीच्या भूमिकेला आवाज दिला होता. पंकज कपूर यांनी आजवर हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय केला आहे. १९९१ साली आलेला ‘एक डॉक्टर की मौत’ आणि २००३ चा विशाल भारद्वाज-दिग्दर्शित ‘मकबूल’ हा चित्रपट त्यांची आजवरची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी होती. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते. करमचंद जासूस १९८६ ची गाजलेली टीव्ही सिरियल जलवा, चालबाज, मासूम तसेच, मंडी, जाने भी दो यारो,गांधी, खामोश, हल्लाबोल राख यासारखे त्यांनी चित्रपट केले आहेत. पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि मोहनदास बीए एलएलबी, वाह भाई वाह, साहेबजी बिबीजी गुलामजी’, दृष्टान्त, कनक डी बल्ली, अल्बर्ट ब्रिज आणि पांचवां सवार या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. नीलिमा अजीम या पंकज कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत. नीलिमा अजीम यांच्याशी घटस्फोट घेऊन सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केले. शाहीद कपूर हा पंकज कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा. शाहीद कपूर हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आहे.
संजीव वेलणकर पुणे.