आज दि.28 मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

ठरलं दहावीची परीक्षा
होणार नाही : वर्षा गायकवाड

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा करीत इयत्ता दहावीच्या परीक्षेबाबतच्या शंका कुशंकांना पूर्णविराम दिला आहे. राज्य सरकार यंदा इयत्ता दहावीची परीक्षा घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तसेच, इयत्ता १०वीच्या निकालासाठी ५०, ३० आणि २० असा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. ५० गुण हे इयत्ता नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत असतील. तर, लेखी मूल्यमापनाद्वारे ३० गुण आणि २० गुण गृहपाठ, तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक यावर आधारीत राहणार आहेत.

सीबीएसई १२ वीची परीक्षा
१५ ऑगस्टपूर्वी होणार

परीक्षांचे नियोजन गेल्या वर्षभरापासून चांगलेच बिघडले आहे. अशात सर्व केंद्र व राज्य सरकारांनी १० वीच्या परीक्षेला बायपास केल्यामुळे भविष्याची चिंता वाढलेली आहे. पण सीबीएसई १२ वीची परीक्षा होणार आहे आणि तारखा जाहीर झाल्यावरही विद्यार्थ्यांना तयारीसाठी जवळपास दीड महिना मिळणार आहे. जुलैच्या अखेरीस ही परीक्षा सुरू होईल आणि १५ ऑगस्टपूर्वी आटोपती घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय शिक्षण मंडळाने दिले आहेत.

औषधांच्या किटमध्ये
कोरोनीलचा समावेश नाही

केंद्र सरकारने करोना औषधांच्या किटमध्ये कोरोनीलचा समावेश का केला नाही?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बाबा रामदेव म्हणाले,”हा आमचा दोष नाही, तो सरकारच्या धोरणांचा दोष आहे. तुम्ही हे आमच्यावर का लादता? तुम्ही देशातील कोणत्याही शहरात जाऊन बघा, १०० पैकी ९० रुग्ण योग, प्राणायाम आणि आयुर्वेदीक उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. मग असं कसं म्हणता की अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती व डॉक्टरांनीच लोकांचे जीव वाचवलेत? अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण गमावून रुग्णांचे जीव वाचवले. नाहीतर वैद्यकीय विज्ञानाला काय अर्थ राहिल,” असं बाबा रामदेव म्हणाले.

अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च
न्यायालयाचे न्यायाधीशपदी नियुक्ती

भारताच्या राष्ट्रपतींनी, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम १) ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत, श्री न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, नितीन भगवंतराव सूर्यवंशी, अनिल सत्यविजय किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव, मुकुंद गोविंदराव सेवलीकर, वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट, देबद्वार भालचंद्र उग्रसेन, श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे आणि नितीन रुद्रसेन बोरकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांची, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.

३ महिन्यांत खाद्य तेलांच्या
किंमती दीडपट वाढल्या

जागतिक बाजारपेठेत विविध करांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे गेल्या ३ महिन्यांत खाद्य तेलांच्या किंमती दीडपटाहून अधिक वाढल्या आहेत. भाज्या आणि डाळींचे भावही वाढले आहेत. पाम तेलाची किरकोळ किंमत १३८ रुपये प्रति किलो आहे. एका वर्षापूर्वी ही किंमत ८५ रुपये प्रतिकिलो होती. पाम तेलाच्या वेगाच्या वाढत्या किमतींच्या मागे इंडोनेशियाने आकारलेल्या करात अचानक वाढ झाली आहे. आता तर इंडोनेशियातून आयात केलेल्या पाम तेलावर प्रति टन ४०० डॉलरचा कर आकारत आहे. पाम तेलावरील निर्यात कर एप्रिलमध्ये ११६ डॉलरवरून मेमध्ये १४० डॉलर डॉलर्सपर्यंत वाढला आहे. निर्यातीची आकारणी प्रति टन ५५ डॉलरवरून २५५ डॉलरवर केली आहे.

चक्रीवादळा दरम्यान जन्मलेल्या
७५० बालकांचे नाव ठेवले यास

चक्रीवादळ ‘यास’चा धुमाकूळ सुरू असतानाच ओडिसामध्ये ७५० पेक्षा जास्त मुले जन्माला आली आहेत. या सर्व बालकांचे बारसे सध्या साजरे होत आहे. चक्रीवादळाचेच नाव आपल्या बालकांना देण्यासाठी पालक आग्रही आहेत. यास चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दोन दिवस या वादळाचा तडाखा बसत असतानाच ओडीसामध्ये ७५० मुलांचा जन्म झाला आहे. या मुलांचे नाव आता ‘यास’ हेच राहणार आहे.

नव्या बुरशीच्या आजाराचे
बडोद्यात आठ रुग्ण आढळले

बडोद्याच्या एसएसजी रुग्णालयात नव्या बुरशीच्या आजाराचे आठ रुग्ण आढळले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या लोकांना होणा-या काळ्या आणि पांढ-या बुरशीप्रमाणेच कोरोनातून बरे झालेल्यांना किंवा बाधित लोकांना हा आजार होत आहे. डॉ. शीतल सांगतात, कोरोना रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर केला जात आहे. ऑक्सिजनची पातळी स्थिर ठेवण्यासाठी नॉन स्टेरलाइट पाण्याचा वापर केला जात आहे. बुरशीजन्य आजाराची इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.

इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात
मोठ्या बदलांना मंजुरी

नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मोठ्या बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये आता १२ वीमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केल्याशिवाय विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या काही निवडक विषयांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान), टेक्सटाइल (वस्त्रोद्योग) आणि एग्रीकल्चरल (शेती विषयक) इंजिनिअरिंगसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (एआयसीटीई) ने या सर्व बदलांच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.

माणुसकीचा धर्म जोपासताना
कायद्याची अवहेलना करू नका

कोरोना संदर्भातील औषधे आणि इंजेक्शनचा व्यवस्थित पुरवठा करणे तसेच महामारीसंदर्भात योग्य व्यवस्थापन करण्याबाबत मागणी करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर सुनावणी सुरू आहे. राजकीय नेते किंवा अभिनेत्यांच्या या कृतीमागे माणुसकीचा धर्म असू शकतो मात्र ते करताना कायद्याची अवहेलना करत आहेत हे त्यांना ठाऊक नाही. अवैध खरेदी, साठेबाजी, काळाबाजार आणि बनावट औषधे उपलब्ध करण्यासारख्या मुद्दयांना फेटाळून लावण्यासाठी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी राज्य सरकारकडून महाअधिवक्ता अशुतोष कुंभकोणी यांच्याकडून दाखल उत्तरावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

पदोन्नतीमधील आरक्षण महाविकास
आघाडीतील एका नेत्यामुळे रद्द : शेंडगे

महाविकासआघाडीतील एका नेत्याच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. या निर्णयासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मतही शेंडगे यांनी व्यक्त केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी पदोन्नतीसंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले.

मराठा आरक्षण प्रश्नी
विनायक मेटे मोर्चा काढणार

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून समाजातील अभ्यासक आणि जाणकारांच्या भेटीगाठी सुरु असतानाच आंदोलनासाठी आग्रही असणाऱ्या विनायक मेटे यांनीही हालचाल सुरु केली आहे. विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चासाठी परवानगी मिळवण्यासाठी मेटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.

विजय मल्ल्याला ब्रिटन कोर्टाचा
दणका, वकिलाची फी भरण्यास नकार

भारतीय बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय माल्या ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विजय माल्याने ब्रिटन कोर्टात कायदेशीर कारवाईची खर्चाची पूर्तता करण्यासाठी तसेच कोर्टाने रोखलेली रक्कम मागे घेण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका ब्रिटन कोर्टाने फेटाळली आहे. विजय माल्या 7.69 कोटी रुपये म्हणजे 7,50,000 पाऊंडच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठीचा पुरावा सादर करण्यात अयशस्वी ठरला आहे.

घोटाळेबाज मेहुल चोक्सीला
शेजारच्या डोमिनिकामध्ये अटक

मध्य अमेरिकी देश अँटिग्वा येथून अचानक गायब झालेला भारतीय उद्योजक मेहुल चोक्सीला शेजारच्या डोमिनिकामध्ये अटक करण्यात आलीय. जिथून त्याला पुन्हा अँटिगा येथे आणण्याची तयारी सुरू आहे. त्याला डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. तो अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.