‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दमदार पात्र
जन्म. २७ मे १९९१ मुंबई येथे
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. या मालिकेतून आशुतोष घराघरात पोहचला आहे.आशुतोष गोखलेने रुपारेल कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असताना ‘संगीत कोणे एके काळी’, ‘बत्ताशी’, ‘सवाई’ यासारख्या एकांकिकेचे सादरीकरण केले. त्यापैकी ‘बत्ताशी’ या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिकही मिळाले.अगदी सहज साधा अभिनय म्हणून आशुतोषची ख्याती आहे. रक्तातच अभिनय असल्याचं बरेच जण सांगतात. रंगमंच असो व एखादी मालिका सगळ्यांत अगदी सहजपणे रुळणारे आशुतोष गोखले सर्वानाच हवेहवेसे वाटतात. मनमिळाऊ आणि खोडकर स्वभाव ही त्यांची जमेची बाजूच म्हणावी लागेल.’झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेतही आशुतोषने काम केले. त्याने सुबोध भावेच्या भावाची भूमिका केली होती.ओ वुमनिया’, ‘डोन्ट वरी बी हॅपी’ आणि भारत जाधव यांच्या सोबत ‘मोरूची मावशी’ ही नाटकेही त्याने रंगमंचावर गाजवली. भाऊचा धक्का, युनो यासारख्या शॉर्ट फिल्म ही त्याने केल्या आहेत.
आशुतोष गोखले हा ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक “विजय गोखले” यांचा मुलगा आहे. व ज्येष्ठ संगीत नाटककार विद्याधर गोखले हे आशुतोष गोखलेचे आजोबा होत. विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील ” श्रीमान श्रीमती ” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. दम असेल तर, भरत आला परत यांत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ‘दम असेल तर’ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा आशुतोष याला देखील अभिनयाची संधी दिली होती. आशुतोषची आई सविता गोखले आणि बहीण श्रद्धा गोखले दोघीही डेंटिस्ट असून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
तरुण रंगकर्मी अद्वैत दादरकर हा त्याचा आत्येभाऊ. आशुतोष गोखले व अद्वैत दादरकर व इतर काही जणानी “मिथक” या संस्थेची स्थापना केली असून ‘स्वत:ला पटेल व आवडेल असे नाटक करणे’ हा या संस्थेचा उद्देश आहे. सुरुवातीला यात दहा-बारा जण होते नंतर अनेक समविचारी मुले-मुली, ‘मिथक’ला जोडली गेली. आता ‘मिथक’ हा चाळीस जणांचा ग्रूप आहे. त्यांतील जास्त मुले ‘रुपारेल’मधे शिकणारी आहेत.