राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. खासकरुन पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापुरात आज वादळी वा-यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थिती असल्यामुळे पारा खाली आलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
सोलापुरात सोमवारी वादळी वारे, गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे, शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालं. कासेगावांत गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो या कायम ठेवलाय. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही असं स्कायमेटने म्हटलंय.