“राणे दोन वेळा पराभूत झाले होते”, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

राज्यसभा निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसताना देखील भारतीय जनता पार्टीनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. त्यांनी आपले सर्व उमेदवार निवडून आणत मोठा विजयी जल्लोष केला. या हाराकिरीनंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर बोचरी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे पाठिमागे नेलं आणि राज्यसभेच्या पराभवामुळे त्यांची नाच्चकी झाली, अशी टीका राणे यांनी केली होती.

राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “एका पराभवामुळे नाच्चकी झाली असेल तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते. मग त्याचं काय झालं, याचा त्यांनी विचार करावा,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्याला दहा वर्षे पाठिमागे नेलं, याबाबत विचारलं असताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “राज्यसभेची एक जागा पराभूत झाल्याने राज्याच्या विकासात काय फरक पडणार आहे? राणे यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाही, त्यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजावून सांगावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो,” असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले…
“शिवसेनेला सत्तेत असूनही महाविकास आघाडीची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीही मते मिळाली नाहीत. त्यांचे ८-९ आमदार फुटतात. त्यांची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. उलट आम्ही त्यांचीच मते फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.” ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.