ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनणे हे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हाइतकीच अभिमानास्पद बाब असल्याचे साउथॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय चंद्राणा यांनी सांगितले. सुनक यांच्या आजोबांनी हे मंदिर उभारले आहे.
सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडले गेल्यानंतर येथील हिंदू समुदायात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी ही निवड अत्यंत अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. लंडनच्या र्नैऋत्येपासून सुमारे ११० किलोमीटरवर साउथॅम्प्टनमधील वैदिक सोसायटीतर्फे हिंदू मंदिराची उभारणी सुनक यांचे आजोबा रामदास सुनक यांनी १९७१ मध्ये केली आहे. सुनक यांचे वडील यश हे १९८० च्या दशकात या मंदिराचे विश्वस्त होते, असे वृत्त ‘द इंडिपेंडंट’ वृत्तपत्राने दिले आहे. सुनक नियमितपणे हॅम्पशायर शहरातील या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. हॅम्पशायर हे त्यांचे जन्मस्थळ आहे. येथे जुलैत त्यांनी भेट दिली होती. येथे भाविकांसाठी त्यांनी प्रसाद-भोजन सोहळा आयोजित केला होता. त्यांचे कुटुंब हा सोहळा दर वर्षी आयोजित करते.
सुनक हे पहिले हिंदू पंतप्रधान आहेत व दोनशे वर्षांत त्यांच्या रुपाने प्रथमच सर्वात कमी वयाच्या (४२ वर्षीय) पंतप्रधानाची नियुक्ती होत आहे. संजय चंद्राणा यांनी पहिल्या ब्रिटिश आशियाई पंतप्रधानाची ही नियुक्ती उत्साहात साजरी केली. चंद्राणा म्हणाले, की हा एक अभिमानास्पद क्षण आहे. मंदिर सध्या गजबजले आहे. येथे बरेच भाविक त्याच्यासोबत मंदिरात काढलेली स्वत:ची छायाचित्रे दाखवत आहेत. या भेटीदरम्यान सुनक यांनी मंदिरातील तीनशे भाविकांपैकी प्रत्येकासह छायाचित्र काढले होते, असे चंद्राणा यांनी सांगितले. चंद्राणा यांनी सांगितले, की सुनक यांची पंतप्रधानपदी निवड म्हणजे ब्रिटनमधील एकात्मतेचे बोलके उदाहरण आहे. ज्या भारतीय उपाहारगृहात सुनक यांनी किशोरवयात काही काळ काम केले, त्याचे मालक कुटी मिया यांनी सांगितले, की सुनक यांना आपण ते दोन महिन्यांचे असल्यापासून ओळखतो. ते देशाचे अधिक चांगले नेतृत्व करतील.
नारायण मूर्ती यांच्या जावयाला शुभेच्छा
आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो व त्यांच्या यशासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपले जावई ऋषी सुनक यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली. मूर्ती यांनी सांगितले, की ब्रिटनच्या जनतेसाठी सर्वोत्तम सेवा ते देतील, असा विश्वास आहे. कॅलिफोर्नियातील ‘एमबीए’साठी स्टॅनफोर्ड येथे असताना इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर २००९ मध्ये सुनक यांनी अक्षतासोबत विवाह केला. या दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.