मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी
विविध पक्षांचे राजकीय नेते कोणत्याही विषयांवरील आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. अशा विधानांमुळे बऱ्याचदा वाद-विवाद होतात. अर्थात ही स्थिती काही नवीन नाही. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे हे विधान देशाच्या चलनाशी संबंधित आहे. भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधी तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी माता आणि श्री गणपतीचं चित्रं असावं, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासाठी सर्व नोटा बदलण्याची गरज नाही, पण नवीन नोटा छापताना त्यावर लक्ष्मीमाता आणि गणपतीचं चित्रं घ्यावं, असंदेखील केजरीवाल यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांचं हे विधान जोरदार चर्चेत आलं आहे. तसंच हे विधान करताना त्यांनी काही उदाहरणंदेखील दिली आहेत.
रितेश-जेनेलियाचं ‘वेड’; पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाहत्यांना दिली जबरदस्त बातमी
जेनेलियानं 2003 मधे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. दोघांनी बऱ्याच चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. कायमच ते सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात. अशातच दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
रितेश देशमुखने त्याचा आगामी चित्रपट ‘वेड’ च्या पोस्टरचे अनावरण केले आहे. पोस्टर शेअर करत रितेशनं एक लक्षवेधी कॅप्शनही लिहिलं आहे. ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या. ‘, असं रितेश म्हणाला.
पायात घुंगरांची चाळ आणि कवड्यांची माळ, कोल्हापुरात रंगला म्हशींचा फॅशन शो
हलगीचा आवाज आणि सगळीकडे सजलेल्या नटलेल्या म्हशी.. असे वातावरण आज कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या गावात देखील पाहायला मिळाले निमित्त होते दिवाळी पाडव्याचे. शिंगांना रंगीबेरंगी मोरपीस घालून, पायात चांदी-सोन्याचे तोडे आणि कवड्यांच्या माळ, घुंगरांची चाळ यांनी सजलेल्या डौलदार म्हशी आपल्या धन्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात म्हशींचा फॅशन रोड शो भरवण्यात आला होता. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा अनुभवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.
बावड्यातील भारतवीर मित्र मंडळ मागील 10 वर्षांपासून दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करते. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील म्हशींचे मालक आपल्या लाडक्या म्हशीला सजवून मिरवण्यासाठी घेऊन आले होते. हौशी कोल्हापूरकर आणि त्यांचे म्हशीवरचे प्रेम हे एक अतूट समीकरण आहे. दिवाळी पाडव्याला म्हशींना सजविण्यासाठी या ठिकाणी म्हैस मालकांच्यात ईर्षा बघायला मिळाली. म्हशीच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत त्यांच्यात चढाओढ दिसत होती. यावेळी या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या हस्ते या सोहळ्यात सहभागी झालेल्या म्हैसमालकांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी गाडीवर बसून म्हैस पळवण्याचा देखील अनुभव घेतला.
काँग्रेसचे नवे बॉस मल्लिकार्जुन खर्गें यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला
काँग्रेस अध्यक्षपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार शशी थरूर यांचा पराभव केला. त्यामुळे सुमारे अडीच दशकांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अखेर आज, बुधवार (26 ऑक्टोबर 2022) रोजी खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.
खर्गे यांनी बुधवारी औपचारिकपणे काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. या वेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. एका सामान्य कार्यकर्त्याची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून हा सन्मान दिल्याबद्दल आज मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.’
विनिंंग काँबिनेशन की टीममध्ये बदल? पाहा काय असेल नेदरलँडविरुद्ध रोहितचा प्लॅन…
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोर पुढचं आव्हान आहे ते नेदरलँडचं. भारतीय संघ 27 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेदरलँडविरुद्ध सुपर 12 फेरीतला आपला दुसरा सामना खेळणार आहे. पण रोहित शर्मा आणि भारतीय संघव्यवस्थापन या सामन्यासाठी संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. त्यात सर्वात जास्त शक्यता आहे ती हार्दिक पंड्याला विश्रांती मिळण्याची. कारण हार्दिक टीम इंडियाचा अनुभवी ऑल राऊंडर आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्ध बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध हार्दिकला विश्रांती दिली तर फारसा फरक पडणारा नाही.नेदरलँडविरुद्ध हार्दिकला विश्रांती दिल्यास रोहित शर्माच्या हाताशी दीपक हुडाच्या रुपात चांगला पर्याय उपलब्ध आहे. जो मधल्या फळीत बॅटिंगसह ऑफ स्पिन बॉलिंगही करू शकतो. काल झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यानं नेट्सममध्ये बराच वेळ सरावही केला होता. याशिवाय रिषभ पंतही मधळ्या फळीतला फलंदाज म्हणून खेळू शकतो.
लक्ष्मीपूजनालाच लाखोंची लक्ष्मी गायब, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातून लक्ष्मी पूजनाला ठेवलेले 17 तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.पनवेलमधील विघ्नहर्ता सोसायटीमधील तळ मजल्यात रूम नं 3 मध्ये महेंद्र काशिनाथ पाटील हे राहतात. त्यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजनासाठी पाटावर घरातील सर्वांचे सोन्याचे 17 तोळे सोन्याचे दागिने आणि 10 हजारांची रोख रक्कम ठेऊन पूजन केले. यानंतर सकाळी घरातील सर्व झोपेत असताना मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर गेला. मात्र, जाताना दरवाजा आतून बंद करायला न सांगताच निघून गेला.
थोड्याच वेळात एक अज्ञात व्यक्ती घरात घुसून पूजनासाठी पाटावर ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम एकूण 7 ते साडे सात लाखांचा ऐवज घेऊन चोर पसार झाला. घरात झोपलेल्या आईला लक्षात आले कुणीतरी आहे. मात्र, तिने आरडा ओरडा करण्याआधीच चोर सर्व माल घेऊन पसार झाला.
ठाकरे गटाला आणखी एक धक्का, निवडणूक आयोगाकडून अडीच लाख प्रतिज्ञापत्र रद्द
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला वेगवेगळी चिन्हे देण्यात आले. दरम्यान खरी शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगात अद्याप लढाई सुरू आहे. यावरून ठाकरे गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी जोरदार बांधणी सुरू आहे. यासाठी ठाकरे गटाकडून मागच्या दोन दिवसांपूर्वी तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञपत्र पुन्हा निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. दरम्यान ही माहिती चुकीची असल्याची माहिती ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन, शरद पवारांनी व्यक्त केला शोक
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज रात्री 9 वाजता पाषाण स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होईल. दरम्यान विनायक निम्हण यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
विनायक निम्हण यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 1999 साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 1999 ते 2014 पर्यंत एकूण 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते.
दादांसाठी राष्ट्रवादी पुन्हा आशावादी! ‘महाविकासआघाडी’मध्ये अजित पवार मुख्यमंत्री?
आगामी विधानसभा निवडणुका महाविकासआघाडीमध्ये लढवण्यासाठी उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही आहेत. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसही मुख्यमंत्रीपदासाठी आशावादी आहे. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
‘अजितदादांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तर त्याचा आनंद आहे. पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल, पण जेव्हा आम्ही आघाडी म्हणून एकत्र येतो, तेव्हा आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतात. हा निर्णय आम्हा आमदारांना पाळावा लागतो, पण दादांसारखा धडाडीचा मुख्यमंत्री कधीही फायद्याचा ठरेल,’ असं रोहित पवार म्हणाले आहेत.
ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचं फ्लाईट झाली मिस; उबर कंपनीला 20 हजारांचा दंड
अनेकदा आपण कुठेही बाहेर जायचं असल्यास कॅब बुक करतो. कधी-कधी कॅब सर्व्हिसच्या तर्हेवाईकपणाचेही अनुभव ऐकतो. नुकतीच मुंबईतही एका महिला ग्राहकासोबत अशीच घटना घडलीय. या महिलेने ग्राहक मंचाकडे (Consumer Court) उबर कंपनीविरोधात तक्रार केली आहे. त्यात तिने उबरवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने तक्रारीत असं म्हटलंय की, उबरच्या कॅब ड्रायव्हरमुळे तिचं फ्लाईट चुकलं. त्यामुळे तिला दुसरं फ्लाईट बुक करावं लागलं. हे प्रकरण 2018 मधलं असलं तरीही कोर्टाने आता आदेश दिला आहे. कोर्टाला महिलेच्या आरोपात तथ्य आढळल्याने उबर इंडियाला कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कंपनीने त्या महिला ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंझ्युमर कोर्टाने दिले आहेत. कंझ्युमर कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून उबर इंडियाला 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.
मुंबईतील व्यावसायिकानं केदारनाथधामला दान केलं 230 किलो सोनं, मंदिराच्या भिंती सोन्याने मढवल्या
भारतामध्ये धार्मिक स्थळी, एखाद्या मंदिरात दानधर्म करणाऱ्या भाविकांची कमी नाही. सोनं, चांदीच्या दागिन्यांसह कोट्यावधी रुपयांचं दान करणारे देणगीदार भारतात आहेत. आता मुंबईतील एका व्यापाऱ्यानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंडमधल्या जगप्रसिद्ध श्री केदारनाथ मंदिराच्या भिंतींना पत्रा लावण्यासाठी तब्बल 230 किलो सोनं दान केलं आहे. या दानशूर व्यापाऱ्याचे उत्तराखंड सरकार आणि मंदिर समितीनं आभार मानलेत. ‘एशियानेट न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय.
भारतात धार्मिक स्थळांना देणगी देणाऱ्यांची कमतरता नाही. त्यांची श्रद्धा मंदिरातील देवासोबत इतकी जोडलेली असते, की ते त्यांच्या श्रद्धेपोटी लाखो रुपये, सोनं-चांदी इत्यादी दान करतात. आता मुंबईतील एका व्यापाऱ्याने केदारनाथ मंदिरासाठी 230 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्यानं श्री केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती मढवण्यात आल्यात. या भिंतींना सोन्याचा पत्रा लावला असून, त्यावर भगवान शंकराचं प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हंही कोरण्यात आली आहेत. यासोबतच ‘जय केदारनाथ धाम’ आणि ‘हर हर महादेव’ असे मंत्र देखील लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या या भिंती आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. दरम्यान, या पूर्वी केदारनाथधामच्या गर्भगृहाच्या भिंती चांदीच्या होत्या.
“पेंग्विनमुळे मुंबईच्या महसूलात वाढ होत असल्याचा आनंद”; आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत व्यक्त केली भावना
काही वर्षांपूर्वी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे संकल्पनेतून मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. मात्र, या पेंग्विनचे मुंबईत आगमन झाल्यानंतर विरोधकांनी मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असेलल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. पण आता मुंबईतील वीर जिजामाता भोसले उद्यानात पेंग्विन आणि इतर प्राणी बघण्यासाठी होत असलेली गर्दी बघून आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. “मुंबईत महापालिकेंतर्गत आम्ही वीर जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्राहलयाचे जे काम केले आहे, त्याचा आज अभिमान वाटतो आहे. या प्राणीसंग्रहालयातील प्राणीही मुंबईच्या महसूलात हातभार लावत असल्याचा आनंद आहे. नागरीक विशेषत: पेंग्विन बघण्यासाठी गर्दी करत असून त्याद्वारेही मुंबईच्या महसूलात प्रचंड वाढ होत असल्याचे” आदित्य ठाकरे म्हणाले.
“एका महिलेमुळे मी…”, कर्नाटकमधील साधूच्या आत्महत्येनंतर खळबळ
कर्नाटकमधील ४५ वर्षीय लिंगायत संताच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बसवलिंगा स्वामी यांना हनीट्रॅप करण्यात आलं होतं. तसंच त्यांना आक्षेपार्ह व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल केलं जात होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये असणारी दोन नावं मठाशी संबंधित नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. “एक अज्ञात महिला आणि बसवलिंगा स्वामी यांच्यातील खासगी क्षण एका महिलेने फोनमध्ये रेकॉर्ड केले होते,” अशी सूत्रांची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘सुसाईट नोटमध्ये एका महिलेने माझ्यासोबत हे केलं आहे’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
विराटने आयसीसी क्रमवारीत घेतली झेप, सुर्यकुमार यादवची मात्र घसरण
मेलबर्न येथे पाकिस्तान विरुद्ध त्याच्या टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीला आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीतही फायदा झाला आहे. किंबहुना, ताज्या आयसीसी क्रमवारीत त्याने ५ स्थानांनी झेप घेत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. कोहली सध्या ६३५ गुणांसह ९व्या स्थानावर आहे.विराटच्या या प्रमोशनमागे पाकिस्तानविरुद्ध केलेली मुख्य खेळी हे प्रमुख कारण ठरले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले.
SD Social Media
9850 60 3590