राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी सारखं काही नाही. इम्रान प्रतापगढी महत्वाचा युवक कार्यकर्ता असून त्याने पक्षा करता खूप काम केलंय. मुकुल वासनिक यांना राजस्थान मधून प्रतिनिधीत्व मिळालंय. आपण उत्तर प्रदेशला आणि राजस्थान आपल्याला मत देणार असल्याची स्पष्टोक्ती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही, फक्त काही अडचणींवर दिल्लीत चर्चा होणार आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.
शिर्डीमध्ये काँग्रेसकडून दोन दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात असलेल्या नाराजीवर थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं.
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. यावर बोलताना आशिष देशमुख युवक नेता आहे. वयामुळे थोडासा लवकर गरम होतो. संघटनेत सर्व व्यक्तीमत्व महत्वाचे आहेत. त्यांच्या कुटुंबाचं काँग्रेससाठी महत्वाचं योगदान आहे. आम्हाला त्यांचा सहभाग काँग्रेसमध्ये हवाय. नाराजीबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
‘आमचे प्रमुख नेतृत्व दिल्लीत आहे. अनेकदा दिल्लीत बैठका होत असतात. आमचं तीन पक्षांचे सरकार आहे. काही प्रश्न तर आहेच, अडचणी आहेत मी ते नाकारत नाही. पण एका पक्षाचे सरकार असलं तरी अंतर्गत प्रश्न असतातच. तीन पक्षांतील आमच्या सरकारमधील अडचणींची चर्चा दिल्लीत होणार आहे. मात्र केवळ त्याकरता बैठक आहे असं नाही, असंही थोरांतांनी महाविकास आघाडीत असलेल्या नाराजी बाबत बोलताना स्पष्ट केलंय.
सप्टेंबरनंतर अनेक निवडणुका होणार आहेत. चिंतन शिबिरात यावर ही चर्चा केली जाणार आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार असून निवडणुकीत एकत्र येण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार असल्याचं म्हणलंय.