कोरोना आणि लॉकडाऊनचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. सध्या राज्यात काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे, असं सांगतानाच जुने व्हायरसही परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला. सर्वांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं. इथून तिथे, तिथून इथे काहीजण प्रवास करत असतात. ते वेगवेगळी ठिकाणं पाहात असतात. मधल्या काळात तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनी एक शब्द वापरला होता. रिव्हेंज टुरिझम. म्हणजे टुरिझम रिव्हेंज. ते लक्षात आलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं. जरा सावधता बाळगा. सर्व राज्यांना सांगितलं. कोरोनाचं संकट गेलं नाही. आणि पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होते की पुन्हा हे संकट येऊ शकेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अजूनही थोडे दिवस थांबलं पाहिजे. कोरोनाचं संकट खरंच गेलं का? पूर्ण गेलेलं नाही. थोडसं आहे. काही काही तर जुने व्हायरस परत आलेत. ते पण दिसतंय, जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. या जुन्या आणि नव्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला. काहीजण म्हणतील हे उघड केलं, ते उघडं का करत नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व उघडं करायचं आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा. सामान्य नागरिकांना रोजीरोटी मिळाली नाही तर देशात नाही तर जगात अस्वस्थता माजेल. हे होऊ नये म्हणून पुढच्या काळात उद्योग, उद्योजकांची महाराष्ट्राला खूप गरज आहे. ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे ही महत्वाचे आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. या सुविधा देतांना राज्याचा समतोल बिघडता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. उद्योजक, सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्या घटकांकडे मला मुख्यमंत्री म्हणून समान लक्ष द्यायचे आहे. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी उद्योग सुरु राहणे महत्वाचे आहे. हे आपण का करतो तर दोन घास शांततेने खाण्यास मिळण्यासाठी. त्या शेतकऱ्यांना जपणे ही शासनाची जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं.