नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या हत्याकांडात आठ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन महिन्यांच्या तपासानंतर हत्येचा छडा
गेल्या पाच एप्रिल रोजी संजय बियाणी यांची दोन मारेकऱ्यानी गोळ्या झाडून हत्या केली होती . तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावला आहे. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड रिंधाचा संबध असण्याची शक्यता आहे.
नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बाहेरून ते साडे अकरा वाजता घरी आले, तेव्हा आरोपींनी अगदी त्यांच्या कार जवळ येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.