ही गोष्ट आहे प्रिया भार्गवची. ती नोएडात राहते. काही वर्षांपूर्वी तिला ल्यूपस नावाचा आजार जडला होता. या आजारानं तिच्या शरीरांतील अनेक अवयवांवर परिणाम झाला. तिच्या माकडहाडावर याचा दुष्परिणाम झाला आणि तिला व्हीलचेअरवर बसावं लागलं. या व्हीलचेअरला त्यांनी आयुष्याचा शेवट नव्हे, तर सुरुवात मानलं.
अनेकदा असं होतं की सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात आणि कुठूनतरी प्रकाशाचा एक किरण तुम्हाला दिसतो. त्यावेळी जाणीव होते की हा शेवट नाही, तर सुरुवात आहे. माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं. आजपर्यंत मी तो क्षण विसरू शकलेले नाही. एका क्षणात माझं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं. त्यावेळी मी फक्त 19 वर्षांची होते. माझं आयुष्य अगदी नॉर्मल सुरू होतं.
प्रत्येक तरुणाप्रमाणेच माझ्याही डोळ्यांत भविष्याची स्वप्नं होती. डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यासाठी मी प्रवेश परीक्षाही दिली होती आणि त्यात पासही झाले होते. मी फिजिओथेरपीच्या कोर्सला प्रवेश घेतला होता. खूपच आनंदात होते. दिवसरात्र पुस्तकांच्या सानिध्यात जात होते. सगळं काही खूप छान चाललं होतं. त्याच वेळी माझ्या आयुष्यात एक वादळ आलं, ज्याचे परिणाम आजही जाणवत आहेत.
अचानक माझी तब्येत बिघडली. डॉक्टरांना दाखवल्यानंतर बऱ्याच संशोधनानंतर माझ्या आजाराचा शोध लागला. डॉक्टरांनी सांगितली की मला ल्यूपस नावाचा आजार झाला आहे. या आजारामुळे माझ्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ लागला होता. माकडहाड खराब झालं. ब्लॅडर कंट्रोलही जाऊ लागला. फिजिओथेरपीचं शिक्षणही मागे पडलं. आता मी पूर्णतः बेडला खिळले होते. संसर्ग माझ्या शरीरभर पसरत होता. लवकरच मला व्हीलचेअरवर ठेवण्यात आलं.
माझी ही अवस्था पाहून आईवडील जाम घाबरले होते. त्यांनी मला मात्र तसं दाखवलं नाही. माझी परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिकटच होत चालली होती. मी डिप्रेशनमध्ये गेले. डॉक्टर म्हणाले की मला स्क्रिझोफेनिया झाला आहे, जो फार गंभीर आजार आहे. या आजारामुळे मी इतरांवर संशय घेऊ लागले होते. स्वतःच्याच आईवडिलांना मारू लागले होते. स्वतःला इजा करून घेत होते. असं वाटायचं जणू सगळं जग माझ्याविरुद्ध कारस्थान रचतंय.
दिवसामागून दिवस जात होते. डॉक्टरांनी माझ्यावर अनेक सर्जरी केल्या. एक दिवस डॉक्टर म्हणाले की मी काही वाचू शकणार नाही. सगळ्या नातेवाईकांना बोलावून घ्या, असं त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं. मात्र नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं. पुढच्याच दिवसापासून मी बरी होऊ लागले. हळूहळू मी अशा अवस्थेला पोहोचले की मला बरं वाटायला सुरुवात झाली होती. आपलं आयुष्य आता व्हीलचेअरवरच जाणार, हे मी स्विकारलं होतं.
हे सत्य स्विकारल्यानंतर मी मनाशी निर्णय केला की आता बस्स. मला या अवस्थेत फार काळ जगायचं नाही. काही ना काही तर करायचंच आहे. माझं शिक्षण अर्धवट राहिलं म्हणून काय झालं? मी असं काहीतरी करेन, जे घरी राहून मला करता येईल. त्यामुळेच मी आजूबाजूला राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. त्यासोबतच मी युपीएससीची पुस्तकंही वाचत बसायचे. दुपारच्या वेळी ट्यूशन घ्यायचे. त्यामुळे हळूहळू मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ लागले होते.
याच काळात मला एका अनोख्या स्पर्धेविषयी माहिती मिळाली. मिस्टर अँड मिस व्हीलचेअर. अपंग आणि दिव्यांगांसाठी राष्ट्रीय पातळीवर ब्युटी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्या अनेक मित्रांनी मला त्यात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मी सुरुवातीला यासाठी तयार नव्हते. तरीही, मी ईमेल करून माझे काही फोटो आयोजकांना पाठवले.
ही स्पर्धा बंगळुरूत होणार होती. जेव्हा मी आईबाबांना हे सांगितलं, तेव्हा ते स्वतःच मला तिथं घेऊन गेले. त्या स्पर्धेत सुमारे 250 मुली सहभागी झाल्या होत्या. बरीच मेहनत केल्यावर अखेर फायनलमध्ये मी त्या सर्वांना मागे टाकत स्पर्धा जिंकली. त्यानंतर माझा आत्मविश्वास कमालीचा वाढला. आतापर्यंत मी माझं पुढचं शिक्षणं पूर्ण केलं आहे. आता माझं एक यूट्यूब चॅनलही आहे, ज्यावर मी छोटे-मोठे मोटिवेशनल व्हिडिओ बनवते. याबरोबरच मी दिव्यांगांसाठी काही काम करू इच्छिते, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळू शकेल.