अजित पवार यांनी केले निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी एका दिव्यांग कार्यकर्त्याने अजित पवारांच्या हातात एक चेक ठेवला. चेकवरील नाव वाचून अजितदादांनी लागलीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना फोन केला आणि तुझं काम चांगलं चालू आहे, असं म्हणत शुभेच्छा दिल्या.

पुण्यातील कोरोना विशेष बैठकीत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी अजित पवार यांनी राज्यातील जनतेला अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ॲम्बुलन्स आणि इतर वैद्यकीय साहित्याचे त्यांनी लोकार्पण केले.

यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी अजित पवार यांच्याकडे चेक सुपूर्द केले. या चेकची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन अजित पवार यांनी संबंधितांना पावती आणि आभार मानणारे पत्र देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एक दिव्यांग कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने अजित पवारांच्या हातांमध्ये एक चेक ठेवला.

चेकवर नाव होतं निलेश लंके फाउंडेशन, तर मदत होती 2100 रुपयांची. ही बाब लक्षात आल्यानंतर निलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. या सूचना देताना अत्यंत बारकाईने चेकवरचे नाव, दिनांक या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, हे तपासून घेण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. निलेश लंके हे अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

दरम्यान अजित पवारांच्या स्वीय सहायकांनी थेट निलेश लंके यांना फोन लावून दिला. अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याशी बोलायला सुरुवात केली. “तुझे कोव्हिड सेंटरचे काम टीव्हीवर बघून अनेक जण मदत करत आहेत. तुझं काम चांगलं चालू आहे. तुझं काम बघून आमच्या काही कार्यकर्त्यांनाही तुला मदत करायची आहे. एकवीसशे रुपयांचा चेक दिलाय, तो तुझ्याकडे पाठवतोय, असंच काम सुरु ठेवा” अश्या सूचनाही अजित पवार यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.