करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना आपलं खासगी आयुष्य उलगडून सांगण्याची वेळ धनंजय मुंडेंवर आली होती. त्यावरुन उडालेला धुरळा शांत होतो, न होतो, तोच पुन्हा एकदा या नात्यासंबंधी चर्चेला उधाण आले आहे.

माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, अशी माहिती करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन देण्यात आली आहे.
करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा इशारा करुणा यांनी याआधीच दिला होता.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशाराही करुणा यांनी दिला होता.

महापौरांची भेट घेऊन करुणा यांनी स्वच्छतागृह आणि कचऱ्याचा प्रश्न मांडल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली होती. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॕप्लिकेशन्सवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येत असतात, त्याविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली होती.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं होतं. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.