आमंत्रण की, निमंत्रण? अर्थामध्ये नेमका फरक काय?

सध्या सगळीकडे लग्नसराईचा काळ आहे. सर्वांच्याच घरी लग्नाच्या पत्रिका जवळपास वर्षभर येत असतात; ज्यात आग्रहाचे निमंत्रण किंवा आमंत्रण असं लिहिलंलं असतं. आपण त्यातील लग्नाची किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाची वेळ आणि दिवस पाहून पत्रिका बाजूला ठेवतो. पण यातील आमंत्रण आणि निमंत्रण हे शब्द नेमके कधी आणि का वापरले जातात याचा विचार कधी केला आहे का? या दोन्ही शब्दांमध्ये नेमका फरक काय? जाणून घेऊयात त्याचा अर्थ आणि यातील कोणत्या शब्दाचा वापर नेमका केव्हा करावा…

रोजच्या जीवनात सर्रास वापरले जाणारे आमंत्रण आणि निमंत्रण या शब्दांचा अर्थ खूप वेगळा आहे. अनेकदा आपण दोन्ही एकत्र किंवा त्यांची अदला-बदल करून एकाच अर्थी वापरतो. पण हे शब्द नक्की कधी वापरावे आणि त्यामागचं कारण काय किंवा लग्न पत्रिका, कार्यक्रम पत्रिका किंवा कार्यक्रमांची इन्व्हिटेशन कार्ड्स यांच्यावर आमंत्रण किंवा निमंत्रण कधी लिहिलेलं असतं आणि ते का याचा आढवा या लेखातून घेणार आहोत.

आमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरावा?
जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी किंवा विशिष्ट कार्यक्रमाला बोलवतो. पण या कार्यक्रमाची कोणतीही वेळ ठरलेली नसते. तेव्हा अशा प्रकारच्या बोलवण्याला आमंत्रण असं म्हणतात. उदा. आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र- मैत्रिणींना घरी जेवणासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बोलवत असतो. त्याची वेळ ठरलेली नसते. ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना शक्य त्या वेळी येऊ शकतात.

निमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरावा?
जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरलेली असते आणि त्यातील कार्यक्रम एका विशिष्ट वेळीच पार पडणार असतो. या ठिकाणी वेळेचं बंधन असतं. अशा प्रकारच्या बोलवण्याला निमंत्रण असं म्हणतात. उदा. लग्नाची पत्रिका, या पत्रिकेत लग्नाचा मुहूर्त दिलेला असतो आणि पाहुण्यांना त्याच वेळेत लग्नाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं असतं. याशिवाय संस्थाचे वार्षिक कार्यक्रम किंवा असे सर्वच कार्यक्रम ज्यात येणाऱ्या पाहुण्यांना वेळेचं बंधन पाळणं गरजेचं असतं.

आता अपेक्षा अशी की, आमंत्रण आणि निमंत्रण यात कोणताही घोळ न करता आपण हे शब्दप्रयोग जपून आणि गरजेनुसार करू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.