बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे रविवारी दिलसभरातील ढगाळ हवामानानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हलका पाऊस सांगली जिल्ह्याच्या काही भागात पडला. अवकाळी पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.हवामान खात्याने पूर्व सूचना दिल्याप्रमाणे पहाटेपासून ढगाळ हवामान असल्याने ऐन हंगामात थंडी गायब झाली आहे. १४ सेल्सियसपर्यंत खाली आलेले किमान तपमान रविवारी १९ अंशापर्यंत पोहचले, तर कमाल तपमान २९ अंश सेल्सियस होते.
सायंकाळी तुषार स्वरुपात अल्प काळ पावसाने हजेरी लावली. सध्या द्राक्षाचे पिक तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आहे. काही बागातील मालाची काढणी सुरु आहे, तर काही बागातील मणी तयार होण्याच्या स्थितीत आहे. आजच्या हलक्या पावसाने फार धोका नसला तरी बुरशीजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.