शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले होते. सिल्लोडमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सत्तार यांच्या या वक्तव्याचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला.
‘मी ज्या मतदारसंघात आलो आहे तिथल्या गद्दाराच्या मनात घाण आहे. घाणेरडं राजकारण सुरू आहे. गलिच्छ राजकारण सुरू आहे. शिवीगाळ करत आहेत. सुप्रियाताईंना जे बोलले ते बोलू नका, ते बोलण्यासारखं नाही. हा सत्तेचा माज आहे. सत्तार यांच्या मनात काळं आहे. मंत्री होताच सत्तेची मस्ती चढली. टीईटी घोटाळा केला, शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
‘ओला दुष्काळ कुठे आहे, हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही. खोके सरकारचे कृषीमंत्री आहेत. प्राथमिक सर्व्हे झाले का? मतदारसंघात फिरले का? पुणे-नाशिकमध्ये कोण कृषीमंत्री आहे हेच माहिती नाही. मला छोटा पप्पू म्हणता, मी स्वीकारतो, पण शेतकऱ्यांना मदत करा, मग मी पप्पू नाव स्वीकारतो,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकार कोसळणार
‘तुम्ही गद्दार आहात, हे सरकार 2-3 महिन्यांमध्ये कोसळणार आहे. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. हे गद्दार काय करत होते, यावर आम्ही नजर ठेवली नाही. कोणत्याही बाईला शिवी द्या, तसे संस्कार तुमच्या घरात असतील. या महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
सगळं काही गुजरातमध्ये जात आहे. यांना माहिती नव्हतं की हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. जे प्रकल्प 100 टक्के येणार होते, ते गेल्याचं दु:ख आहे. उद्योगमंत्र्यांचे काय उद्योग चालतात ते आम्हाला माहिती नाही. उपमुख्यमंत्री शेंबडी पोरं म्हणतात, माझे बेरोजगार युवक शेंबडी पोरं आहेत का?’ असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.
‘एका गद्दाराच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे चालला. मी सरकारमध्ये असतो तर बाहेर पडलो असतो. देवेंद्र फडणवीस सराकरमध्ये का आहेत ते कळत नाही. जे वातावरण तयार केलं जात आहे, ते ठाकरे परिवाराला संपवण्यासाठी केलं जात आहे,’ असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.