भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? : चंद्रकांत पाटील

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केलीय. राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलंय. ईडीच्या या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. ‘माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू’, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांवरील कारवाईनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. संजय राऊत असे कोणतेही महान नेते नाहीत की, ज्यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यावर जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर बोलावं, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी राऊतांना टोला लगावलाय.

‘राऊतांची भाषा आणि त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडतेय’
ईडीच्या धाडीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केलीय. एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? कोर्टात जा. संजय राऊतांची भाषेची पातळी खूप खालच्या स्तरावर पोहोचली आहे.

राज्यातील जनतेला आता राऊतांची भाषा आणि संस्कृतीचं दर्शन घडत आहे. आमचा एक पडळकर जर थोडा बोलला तर आम्ही लगेच त्याला आवर घातली. कारवाई चुकीची असेल तर त्यांनी कोर्टात जावं. सुरुवातीच्या काळात लोक कौतुकानं बघायचे पण आता राऊतांना कुणी ऐकत नाही. आम्ही चळवळीतील माणसं आहोत, शिवसेनेला घाबरणार नाहीत. राऊतांनी विनाकारण धमक्या देऊ नयेत, असा इशाराच चंद्रकांतदादांनी राऊतांना दिलाय.

त्याचबरोबर यंत्रणांना त्यांचं काम करु द्या. आता हे सगळं शेवटापर्यंत पोहोचत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असा कोणताच नेता राहिला नाही ज्याच्यावर आरोप नाही. असे सरकार जनतेनं कधीच पाहिलं नव्हतं. संजय राऊतच काय तरत महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मोठी यादीच आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केलीय.

ईडीच्या कारवाईनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009 मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.