राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझ्या वृत्तवाहिनीने ‘माझा कट्टा’ कार्यक्रमातून त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. दरम्यान, शिवसेना सोडल्याची किंवा बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का? असे विचारले असता, त्यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत आम्ही श्रीकृष्ण आयोगाची स्थापना करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री होतो. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या सरकारने सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. मात्र, एकेदिवशी अचानक एक फाईस माझ्या टेबलवर आली. त्यात पोलिसांचे काही अहवाल होते. जर मी त्यावेळी बाळासाहेबांविरोधात गुन्हा नोंदवला नसता, तर श्रीकृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही, असा आरोप आमच्यावर झाला असता. बाळासाहेबांना अटक झाली, त्यावेळी त्यांना जेलमध्ये नेऊ नका, असे निर्देश मी पोलीस आयुक्तांना दिले होते”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
“शिवसेना सोडण्याची काही वेगळी कारणं होती. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मी विधानसभेत आमदार होतो. मंडळ आयोग जाहीर झालाच पाहिजे, अशा घोषणा आम्ही देत होतो. व्हीपी सिंह यांनी मंडळ आयोगाची घोषणा केल्यानंतर बाळासाहेबांनी त्याला विरोध केला. जातीनिहाय आरक्षण देऊ नये, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र, मी त्यावेळी भटक्या विमुक्त जातींचा मोर्च्यात सहभागी झालो होतो”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, “जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा बाळासाहेबांनी माझा ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला होता. ‘तो मी नव्हेच’ मधला लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही, तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला”, असेही ते म्हणाले.