‘प्रेमाचा चहा’ साखळी समूहाची एक कोटी ६७ लाखांची फसवणूक

 ‘प्रेमाचा चहा’ साखळी उपाहारगृह समूहाची एक कोटी ६७ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांकडून दोघा संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफोडिल्स, मगरपट्टा सिटी, हडपसर) आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. निवृत्ती स्मृती, साधना हायस्कूल जवळ, माळवाडी, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात चोरी, अपहार, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, धमकावणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिध्दार्थ पंढरीनाथ भाडळे (वय ३८, रा. उरूळी देवाची फाटा, हवेली, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेमाचा चहा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. मगर आणि तुपे यांनी कंपनीकडून वस्तू आणि सेवा कर तसेच प्राप्तिकर कर भरला नाही. कंपनीच्या खात्यात जमा होणारी रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात जमा केली. बेकायदा साखळी उपाहारगृहांचे वाटप केले. कंपनीचा प्रचार प्रसिद्धीचा (सोशल मिडीया) ताबा स्वत:कडे ठेवला. कंपनीच्या समाजमाध्यमावरील पेजवरुन विक्रांत भाडळे यांचे नाव काढून टाकले.

मगर आणि तुपे यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकातील काही जणांना बेकायदा साखळी उपाहारगृहाच्या शाखांची (फ्रॅंचाईजी) विक्री केली. कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर करुन एक कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे भाडळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.