नव्या आव्हानांसाठी भारत सज्ज;मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन 

२१ वे शतक हे खऱ्या अर्थाने ‘भारताचे शतक’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि या शतकातील आव्हानांसाठी देश सज्ज होत असल्याचा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी व्यक्त केला. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, कोविंद यांनी भारताच्या ‘देदीप्यमान लोकशाही सामर्थ्यांला’ सलाम केला आणि ‘‘आपल्या मुळांना घट्ट पकडून राहणे’’ हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ असल्याचे प्रतिपादन केले.

राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना रामनाथ कोविंद यांनी भारतीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘पाच वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवून मला राष्ट्रपतीपदी निवडून दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींचे आभार मानतो,’’ असे कोविंद म्हणाले.

कानपूर जिल्ह्यातील एका खेडय़ातील सामान्य कुटुंबात वाढलेल्या, मातीच्या घरात राहिलेल्या एका तरुण मुलाला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची कल्पनाही नव्हती. तो रामनाथ कोविंद आज तुम्हा सर्व देशवासियांशी संवाद साधत आहे. आपल्या देशाच्या चैतन्यमय लोकशाही व्यवस्थेचे हे सामर्थ्य आहे, मी त्याला सलाम करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.

कोविंद यांनी हवामान बदलाच्या संकटाकडेही लक्ष वेधले आणि येणाऱ्या पिढय़ांसाठी सर्वानी पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन केले. ‘‘निसर्गमाता अतीव दु:खात आहे. हवामानबदलाचे संकट पृथ्वीचे भविष्य धोक्यात आणू शकते. आपल्या मुलांसाठी आपण आपले पर्यावरण, जमीन, हवा आणि पाणी यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना जपले पाहिजे’’, असे कोविंद म्हणाले.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपली वृक्षसंपदा, नद्या, समुद्र आणि पर्वत त्याचबरोबर इतर सर्व सजीवांचे संरक्षण करण्यासाठी अधिक दक्षता घेतली पाहिजे. प्रथम नागरिक म्हणून, मला माझ्या सहकारी नागरिकांना सल्ला द्यायचा झाल्यास मी पर्यावरण संरक्षणाचाच सल्ला देईन, असेही कोविंद यांनी नमूद केले. प्रत्येक कुटुंबासाठी उत्तम घरे, पिण्याचे पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देश काम करत आहे. कोणताही भेदभाव न करता होणारा विकास आणि सुशासनाच्या गतीमानतेमुळे हा बदल घडवणे शक्य झाले असे कोविंद म्हणाले.

कोविंद यांनी आरोग्यसेवा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘साथीच्या रोगाने सार्वजनिक आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. सरकारने या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याबद्दल मला समाधान वाटते, असे कोविंद म्हणाले. एकदा का शिक्षण आणि आरोग्यसेवा सक्षम झाल्या की आर्थिक सुधारणांतून नागरिकांचे जीवन आनंदी होईल, असे ते म्हणाले. आपला देश ‘२१ वे शतक, हे ‘भारताचे शतक’ बनवण्यासाठी सज्ज होत आहे, असा विश्वास कोविंद यांनी व्यक्त केला.

लोकशाहीच्या औपचारिक नकाशाच्या आधारे आपण वाटचाल करीत आहोत. त्याचा मसुदा संविधान सभेने तयार केला आहे आणि संविधान सभेवरील प्रत्येकाच्या अमूल्य योगदानाने तयार झालेली राज्यघटना हा आपला दीपस्तंभ आहे. त्यातील मूल्ये अनादी काळापासून भारतीय लोकाचारात असल्याचे नमूद करीत कोविंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक लोकशाहीमधील फरक स्पष्ट करणाऱ्या संविधान सभेतील समारोपाच्या भाषणाचा उल्लेख केला. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनाची तत्त्वे मानणे, त्यानुसार मार्गक्रमण करणे. या तिन्ही तत्त्वांना परस्परांपासून वेगळी मानता कामा नये. तसे केले तर लोकशाहीचा उद्देशच नष्ट होईल, असे कोविंद यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.