इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला, याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्येही झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले 2 पॉईंट्स कापण्यात आले, याचसोबत टीमला मॅच फीच्या 40 टक्के दंडही आकारण्यात आला. भारतीय टीम निर्धारित वेळेच्या दोन ओव्हर मागे राहिल्यामुळे मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी ही कारवाई केली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये आता भारताची टीम एक स्थान खाली चौथ्या क्रमांकावर आली आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाली आहे.
‘खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी आयसीसीच्या आचार संहितेचा नियम 2.22 नुसार प्रत्येक ओव्हर कमी टाकली तर मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा नियम 16.11.2 नुसार प्रत्येक ओव्हरसाठी एक पॉईंट रद्द केला जातो, टीम इंडिया दोन ओव्हर मागे राहिल्यामुळे त्यांचे 2 पॉईंट्स कापण्यात आले,’ असं आयसीसीने सांगितलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने आयसीसीची शिक्षा मान्य केली, त्यामुळे या प्रकरणाची पुढच्या सुनावणी घेण्यात आली नाही.
पाकिस्तान खराब करणार भारताचा खेळ?
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्रात आतापर्यंत 4 सीरिज खेळल्या, यातल्या 2 भारतात तर उरलेल्या 2 परदेशात होत्या. 6 विजय, 4 पराभव आणि 2 ड्रॉसह भारताचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 52.08 आहेत. तर पाकिस्तानचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 52.38 आहेत.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला अजून दोन सीरिज खेळायच्या आहेत. यातली एक घरच्या मैदानात आणि दुसरी परदेशात आहे. तर पाकिस्तान आणखी 7 टेस्ट खेळणार आहे. यातल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टेस्ट ते घरच्या मैदानात खेळतील, तर उरलेल्या 2 टेस्ट श्रीलंकेत होणार आहेत, त्यामुळे पाकिस्तान टीम इंडियासाठी अडचण ठरू शकते.