आज दि.१२ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

दिवाळीमध्ये कांद्याला येणार ‘सोन्यासारखा भाव’

सणासुदीच्या काळात अनेक गोष्टी वाढत आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. आता स्वयंपाक घरात सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे कांदा . अगदी भाजी असो किंवा नॉनव्हेजसोबत कच्चा खायला असो कांदा हा हवाच असा आग्रह असतो. मात्र याच कांद्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सणासुदीच्या काळात कांद्याचा चांगलाच भाव वाढण्याची शक्यता आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर किलोमागे ५ रुपयांनी वाढले आहेत. मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. नवीन कांदा येण्यासाठी साधारण एक ते दीड महिन्याचा अवधी लागेल. काही कांदा हा खराब झाला आहे. कांद्याची वाढणारी मागणी आणि पुरवठा यामध्ये अंतर पडल्याने भाव वाढले आहेत.

वर्क फ्रॉम होम करताना वेबकॅम सुरू न ठेवल्यानं कारवाई करणाऱ्या कंपनीला न्यायालयाचा दणका

कोविड-19 महामारीपासून जगभरात ‘वर्क फ्रॉम होम’चे कल्चर मोठ्या प्रमाणात रुळले आहे. जगभरातील कोट्यवधी कर्मचारी आपल्या घरात बसून काम करत आहेत. काही कर्मचारी तर मायदेशात राहून परदेशातील कंपन्यांसाठी काम करत आहेत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत दिली असली तरी त्यासोबत काही नियम आणि अटीही लागू केल्या आहेत. त्यांचे पालन न केल्यास कारवाई होते. अशीच एक घटना नेदरलँड्समधील कर्मचाऱ्यासोबत घडली. मात्र, हे प्रकरण कारवाई करणाऱ्या कंपनीच्या अंगलट आलं आहे. फॉर्च्युन मासिकानं दिलेल्या वृत्तानुसार, एका डच न्यायालयानं अमेरिकन कंपनीला आपल्या बडतर्फ कर्मचाऱ्याला 72 हजार 700 डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा स्थित शातो (Chateau) या एका टेलिमार्केटिंग कंपनीच्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांचा वेबकॅम सुरू ठेवून रोज काम करावं लागत होतं. मात्र, या कर्मचाऱ्यानं ‘वर्क फ्रॉम होम’ दरम्यान दिवसाचे 9 तास वेबकॅम चालू ठेवण्यास नकार दिला होता.

पवित्र रिश्तानंतर अंकिता पुन्हा लिड रोलमध्ये; शेअर केला सिनेमातील फर्स्ट लुक

हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेली मराठमोळी अभिनेत्री  म्हणजे अंकिता लोखंडे. तिने अर्चना बनून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यानंतर या अभिनेत्रीने  चित्रपटात काम करत तिथेही आपल्या अभिनयाची छाप सोडली. आता ती अनेक दिवसांनी पुन्हा एकदा नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. ती एका नव्याकोऱ्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही  आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका’ चित्रपटानंतर आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहिले आहे कि, “मला आव्हानात्मक आणि महत्त्वाची पात्रे साकारायला आवडतात जी केवळ कथाच पुढे नेत नाहीत तर प्रेक्षकांवरही प्रभाव टाकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर ही अशीच एक प्रेरणादायी कथा आहे जी सांगायची गरज आहे.  मला या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळतेय याचा मला  आनंद आहे.” तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसेच कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर येऊ शकतात अडचणी

भारतीयांची ओळख सांगणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्डविना तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. बँक अकाउंट उघडायचं असेल तरी ‘आधार’ असणं गरजेचं आहे. परंतु, ते आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर त्याला अपडेट करण्याचा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून देण्यात आलाय. आधार कार्डधारकांनी ओळखीचं प्रमाणपत्र, पत्ता व इतर संबंधित कागदपत्रं अपडेट करण्याबाबत यूआयडीएआयनं सांगितलं आहे.

आधार कार्डला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीनं अपडेट करता येतं. ज्या नागरिकांनी 10 वर्षांआधी आधार कार्ड काढलं आहे आणि दरम्यानच्या काळात त्याला एकदाही अपडेट केललं नाही अशांनी त्याला तत्काळ अपडेट करण्याची गरज असल्याचं यूआयडीएआयच्या वतीनं सांगितलं गेलंय.

कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : अमेरिकेकडून भारताचा पराभव

यजमान भारताला मंगळवारी कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बलाढय़ अमेरिकेच्या संघाकडून ०-८ असा मोठा पराभव पत्करावा लागला. कोणत्याही वयोगटातील महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे हे पदार्पण होते. मात्र, अमेरिकेच्या आक्रमक खेळापुढे भारतीय संघाचा निभाव लागला नाही. अमेरिकेच्या संघाने तब्बल ७९ टक्के वेळ चेंडूवर ताबा मिळवला. तसेच त्यांनी गोलच्या दिशेने ३० फटके मारले, याउलट भारतीय संघ केवळ दोनच फटके अमेरिकेच्या गोलच्या दिशेने मारू शकला.

ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातोय? फडणवीसांनी ठेवलं नियमांवर बोट

शिवसेनेचे नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी आपल्या पालिका नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. मात्र हा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उभे राहता येऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा न स्वीकारण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप केला जातोय. याच आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही कोणावरही तसा दबाव टाकलेला नाही. राजीनाम्याबाबत पालिकेचे काही नियम आहेत, त्याच नियमानुसार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत

नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांचा वापर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो.उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहचवून, मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना काल (मंगळवार) दुपारी १२ वाजता एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात जवानांना यश आले.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! तेल कंपन्यांना देणार २२ हजार कोटी रुपये

केंद्र सरकारने तीन सरकारी इंधन किरकोळ विक्रेत्यांना २२ हजार कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत देशांतर्गत एलपीजीच्या किमतींमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हे अनुदान मंजूर करण्यात आलं आलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तीन तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.

“भारतातील कारागृहात माझी हत्या होईल, अथवा आपण आत्महत्या करू” – नीरव मोदी

पंजाब नॅशनल बॅंकेत १३,५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेला नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. नीरव मोदीच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तसेच, त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातच आता मला भारतात पाठवलं तर, आपली हत्या होईल. अथवा तुरुगांत आपण आत्महत्या करू, असे नीरव मोदीने म्हटलं आहे.

भारतात करण्यात येणाऱ्या प्रत्यर्पणाविरोधात नीरव मोदीने लंडन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी पार पडली. यावेळी नीरव मोदीचे मानसोपचारतज्ज्ञ प्राचार्य अँड्र्यू फॉरेस्टर यांनी सांगितलं की, नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. मात्र, या कारागृहात यापूर्वीही अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.

अर्थव्यवस्था सुसाट! सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो ६.८ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच जगात सध्या मंदीचे सावट असतानाही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? 

सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे फारच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंवरती विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. येथे आपल्याला प्राण्यांपासून ते लोकांच्या सवयींपर्यंत सगळ्याच प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. असा अनेक वर्ग आहे ज्यांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला खूपच आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल.

पण माणसंच काय तर प्राण्यांना ही पाणीपूरी खूपच आवडते. हो हे खरंय… सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हत्ती पाणीपुरी खातोय.

हत्ती पाणीपुरी वाल्याच्या थेल्याजवळ आपल्या माणसांप्रमाणे उभा आहे आणि एका मागून एक पाणीपुरी तो आपल्या सोंडेमध्ये घेऊन खात चालला आहे. पाणीपुरी खाताना हत्तीला कसलं ही भान उरलेलं नाही. त्याची ही शैली फारच मजेदार आहे.

शिवसैनिक आणि उद्धव हीच तुझी मुलं, काळजी घे; न्यायालयातील बाकड्यावरुन संजय राऊत यांचं आईला भावनिक पत्र

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी सत्र न्यायालयात असताना आईला हे भावनिक पत्र लिहिलं आहे. हे पत्र आज संजय राऊत यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आलंय.

संजय राऊत यांनी 8 ऑगस्ट 2022 रोजी आईला हे पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी आईला म्हटलं आहे की, आई, मी नक्कीच परत येईन. जशी तू माझी आई आहेस तशीच शिवसेनादेखील आपली आई आहे

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या शिरला थेट स्वयंपाकघरात; सांगलीतील घटना

भक्ष्य असलेल्या मांजराची शिकार करण्यासाठी पाठी लागलेला बिबट्या थेट स्वयंपाकघरात शिरण्याचा प्रकार वाळवा तालुययातील मरळनाथपूर येथे मंगळवारी रात्री घडला. जेवण करीत असलेल्या घरातील लोकांनी दार बंद करून वन विभागाला माहिती देताच, वन विभागाने मोठ्या हिंमतीने दार उघडून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.