आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील 55 व्या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर इशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. इशान किशनच्या 84 आणि सूर्यकुमार यादवच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकात 193 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईने या सामन्यात 42 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 14 गुण मिळवले आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट कोलकात्यापेक्षा कमी असल्यामुळे मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय होऊ शकला नाही. मुंबईचा नेट रनरेट 0.12 आहे तर कोलकात्याचा नेट रनरेट 0.58 इतका आहे.
मुंबईने या सामन्याची सुरुवात धमाकेदार केली होती. किशनने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने 5.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. यामध्ये रोहितचं योगदान केवळ 18 धावांचं होतं. रोहितला राशिद खानने माघारी धाडलं. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्यादेखील (10) मोठी खेळी करु शकला नाही. पंड्यांनंतर कायरन पोलार्ड 13 धावांचं योगदान देऊन माघारी परतला. मात्र इशान किशनने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 32 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानेदेखील हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. सूर्यकुमारने 40 चेंडूत 82 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
किशन आणि सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या बदल्यात 235 धावांचा पर्वत उभा केला. हैदराबादच्या गोलंदाजांना या सामन्यात विकेट्स मिळाल्या मात्र धावा रोखण्यात त्यांना अपयश आलं. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 4 बळी घेतले. मात्र त्याबदल्यात त्याने तब्बल 52 धावा मोजल्या. तर अभिषेक शर्मा आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. उम्रान मलिकला एक विकेट मिळाली.
236 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादनेदेखील चांगली सुरुवात केली. हैदराबादच्या सलामीवीरांनी 5.2 षटकात 64 धावांची सलामी दिली. जेसन रॉय 34 आणि अभिषेक शर्मा 33 धावा करुन माघारी परतले. प्रियम गर्गने 29 धावांचं योगदान दिलं. हैदराबादचा कर्णधार मनिष पांडेने 41 चेंडूत 69 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. मात्र त्याला विजयश्री खेचून आणता आली नाही. मुंबईकडून या साममन्यात जेम्स निशम, जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर नाईल या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि पियुष चावलाने प्रत्येकी एक विकेट घेतली.