आज दि.८ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाविकासाघाडी सरकारला
दिल्लीवरून रोज त्रास : शरद पवार

दिल्लीवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधान केलं आहे. सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, “मला दिल्लीमध्ये एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने सांगितलं की, तुमचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण त्या दिवशी तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही रूचलं नाही आणि म्हणून तुमच्याकडे पाहुणाचार झाला. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रश्नावर मत मांडायचा अधिकार आहे की नाही? पण, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथे आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही. तुम्ही छापा मारा नाहीतर काही वाटेल ते करा पण आपलं मत कधी सोडणार नाही. सामान्य माणसांची बांधिलकी कदापी सोडणार नाही, या निष्कर्षाशी आपण सगळेजण आहोत.”

‘एअर इंडिया’ ची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे; केंद्र सरकारने दिली माहिती

सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीसाठी चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यातील सर्वाधिक गुंतवणुकीची टाटा समूहाने लावलेली बोली मंजूर करण्यात आली आहे.

एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटदेखील स्पर्धेत होते. यामध्ये टाटा सन्सने बाजी मारली असून एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेली आहे. टाटा समूहाने एअर इंडियासाठी 18 हजार कोटींची बोली लावली. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत एअर इंडियाच्या हस्तांतराचा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे आणि नागरी उड्डान मंत्रालयाचे सचिव राजीव बंसल यांनी दिली.

वर्धापन दिनीनिमित्ताने
भारतीय वायू दलाचे शक्तीप्रदर्शन

८९ व्या वर्धापन दिनीनिमित्ताने आज भारतीय वायू दलाने नवी दिल्ली इथल्या वायू दलाच्या हिंडन या विमानतळावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय वायू दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांना सलामी देत झाली. भारतीय वायू दलाच्या स्थापना दिनानिमित्त वायू दल प्रमुखांनी मग उपस्थितांना संबंधित केले. त्यानंतर भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, वाहतूक करणारी विमाने यांच्या विविध कसरतींनी, ‘एअर शो’ने उपस्थितांची मने जिंकली.

दररोज पाच लाख कोविड प्रकरणांना
सामोरे जाण्यासाठी आरोग्य सेवा तयार

दररोज पाच लाख कोविड प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य सेवा तयार केल्या आहेत अशी माहिती सरकारने गुरुवारी दिली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की भविष्यात करोना विषाणू संसर्गाची इतकी मोठी संख्या नोंदवली जाईल असेही सरकारने म्हटले आहे. संसर्गाच्या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर सज्जतेबाबत माहिती देताना, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यांकडून प्राप्त अहवालांनुसार, देशातील कोविड -१९ रुग्णांसाठी ८.३६ लाख बेड उपलब्ध आहेत आणि याव्यतिरिक्त १० लाख (९,६९,८८५) आयसोलेशन बेड कोविड -१९ केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.

लखीमपूर प्रकरणी यूपी सरकारला
सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले. या सुनावणीत सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी युपी सरकारला फटकारले आहे. सरन्यायाधीशांनी हत्या प्रकरणातील आरोपीला वेगळी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न यूपी सरकारवर उपस्थित केला. तर, नोटीस बजावल्याबद्दल हरीश साळवे यांनी न्यायालयात विचारले असता “आम्ही नोटीस जारी केली नव्हती. आम्ही स्टेटस रिपोर्ट मागितला होता,” असं न्यायालयाने सांगितलं. तसेच योगी सरकारने स्टेटस रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे, अशी माहिती साळवे यांनी कोर्टात दिली.

काश्मिरींना सुरक्षा पुरवण्याची
जबाबदारी केंद्राची : प्रियंका गांधी

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्र सुरू आहे. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांचा बळी घेतल्याने काश्मीरमधील दहशतीचे सावट गडद झाले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये काश्मिरी लोकांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि काश्मिरींना सुरक्षा पुरवण्याचे केंद्राला आवाहन केले आहे.

गुरमीत राम रहीम सिंह दोषी,
12 ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला न्यायालयाने आणखी एका प्रकरणात दोषी ठरवलंय. रणजीत सिंहच्या हत्येसाठी राम रहीम आणि इतर पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. १२ ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाणार आहे. रणजीत सिंहची २००२ मध्ये हत्या करण्यात आली होती. मृत रणजीत सिंह हा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक होता, १० जुलै २००२ रोजी त्याची हत्या करण्यात आली होती.

महाराष्ट्रासह पाच राज्यात करोना
सक्रिय रुग्णांची संख्या वाढली

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक आदी पाच राज्यात 10 हजाराहून कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांनी डोकेदुखी वाढवल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

बहिणींच्या मालमत्तांवर धाडी
का टाकल्या : अजित पवार संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या मालमत्तांवरही आयकर विभागने धाडी मारल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

रोनाल्डो विरुद्ध बलात्काराचा
खटला निकाली काढण्याची शिफारस

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध सुरु असलेला बलात्काराचा खटला निकाली काढण्याची शिफारस अमेरिकन न्यायाधीशाने केली आहे. २००९ मध्ये लॉस वेगस स्थित एका हॉटेलमध्ये माजी मॉडेल कॅथरीत मायोर्गा हीने रोनाल्डोवर बलात्काराचे आरोप केले होते. मात्र या आरोपांचं ख्रिस्तियानो रोनाल्डो याने खंडन केलं आहे. जे काही झालं ते दोघांच्या संमतीने झाल्याचं रोनाल्डोचं म्हणणं आहे. असं असलं तरी कॅथरीन मायोर्गा हीने रोनाल्डो विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.