नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहिणी जायभाये, प्रतिक जायभाये, गणेश जायभाये असे या तिघांची नावे आहेत. या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री या ठिकाणी ज्ञानोबा जायभाये आणि तुकाराम जायभाये हे दोघे सख्खे भाऊ राहतात. त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. या ठिकाणी असणाऱ्या मन्याड नदीपात्राच्या जवळ त्यांचे शेत आहे. काल नेहमीप्रमाणे दोन भाऊ शेतावर गेले होते. त्यावेळी ते आपल्या तिन्ही मुलांनाही शेताकडे घेऊन गेले.
यावेळी ज्ञानोबा आणि तुकाराम हे दोघे शेतातील काम करीत होते. त्यावेळी ही तिन्ही मुले शेळ्या चरत मन्याड नदीपात्राजवळ आली. तेव्हा त्यांना लाकडाचे ओंडके दिसले. त्यामुळे त्यांना पाण्यात तरंगण्याचा मोह आवरला नाही. शेतात शेळ्या चरत असताना त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून हे तिघेजण पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र अचानक त्यांचा तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले. या तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान काही वेळानंतर मुलं दिसत नसल्याचे पाहून तुकाराम आणि ज्ञानोबा यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र बराच वेळ हाका मारुनही त्या मुलांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी त्यांना नदीपात्रात लाकडाचे ओंडके दिसत होते. मात्र मुलं दिसत नव्हती. यानंतर त्या दोघांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यातील काही गावकऱ्यांनी पाण्यात उडी मारुन शोधशोध केली असता, त्यांना तिथे तीन भावंडांचे मृतदेह आढळून आले.