नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 21 जूनला नाशिक दौऱ्यावर येणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अमित शाह यांच्या ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह यांचा दोन दिवसीय कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण झालेलं होतं. पण तसं असताना अचानक त्यांचा दौरा रद्द झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेवरुन देशात वातावरण तापल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे.
केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार केंद्र सरकार तरुणांना चार वर्ष भारतीय सैन्यात काम करण्याची संधी देणार आहे. पण केंद्र सरकारच्या योजनेला देशभरात प्रचंड विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या योजनेला विरोध करताना विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेतल्याचं बघायला मिळालं आहे. काही ठिकाणी तर रेल्वे जाळण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात या योजनेवरुन रोष दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. पण केंद्र सरकारने तरीही ही योजना मागे घेणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, अग्निवीरांना सवलत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह हवाई दल देखील सरसावलं आहे. चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात.
अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे. अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.